खारघरमध्ये अभियंत्याची लय भारी मिसळ

 

 


नावाप्रमाणेच चव असल्याने खवय्यांची पसंती

जागतिक मराठी भाषा दिनविशेष 
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल परिसरात खाद्यसंस्कृती दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. त्यातच एज्युकेशन हब व सायबर सिटी म्हणून ओळखले जाणाऱ्या खारघर मध्ये तर वेगवेगळ्या चविष्ट खाद्यपदार्थांची अधिकच मागणी आहे. दरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अन्नपदार्थांच्या उपाहारगृह आन्ना वेगवेगळे नाव दिले जातात. अशाच प्रकारे खारघर मध्ये लय भारी मिसळ प्रसिद्ध झाली आहे. इंजिनीयर झालेल्या तरुणाने तीन वर्षांपूर्वी मिसळ हाऊस सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लय भारीची दुसरी शाखा सुद्धा सेक्टर 12 गोखले हायस्कूल च्या बाजूला सुरू करण्यात आली आहे. या मिसळची चव सुद्धा नावाप्रमाणेच लय भारी आहे.
    महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आहे. त्यामध्ये मिसळीचा आद्य क्रमांक आहे. ती खवय्ये अतिशय चवीने खातात. घाटमाथ्यावरील मिसळीचा स्वाद काही औरच असतो. ते खाण्यासाठी थेट बेत आखला जातो. किंवा गावाकडे जात असतानाही मधेच मिसळीवर ताव मारण्यासाठी वाहने थांबतात. मिसळ आणि मराठी माणसांचं एक वेगळं नात आहे. तेच जोपासण्याचे काम रोडपाली येथील रहिवासी असलेल्या प्रशांत संभाजी शिंदे या युवकाने केले आहे. इंजिनीयर झालेल्या प्रशांतने नोकरी न करता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याने हॉटेलिंग हा व्यवसाय निवडला. तोही चवदार अशा मिसळीचा. अर्थात त्याचे वडील संभाजी शिंदे आणि आई छाया यांनी त्याला पाठबळ दिले. तीन वर्षांपूर्वी खारघर येथील एस एस पाटील महाविद्यालयाच्या बाजूला प्रशांतने लय भारी नावाने मिसळ उपहारगृह सुरू केले. नावातच चव दडलेली असल्याने काही महिन्यातच लय भारी फेमस झाली. घाटमाथ्यावर जी टेस्ट मिळते ती लय भारीत मिळत असल्याने कित्येक कुटुंब याठिकाणी सकाळच्या नाश्त्याचा बेत आखतात. केवळ सकाळीच नाही संध्याकाळीही लय भारीचा खमंग येतो. त्यामुळे खारघर आणि लय भारी मिसळ असं एक प्रकारचा समीकरण निर्माण झाले आहे. केवळ या वसाहतीतलच नाही तर पनवेल, बेलापूर, नेरूळ, कामोठे आणि कळंबोली येथूनही खवय्ये लय भारीत येतात. कोणतेही रेडी मेन्ट वस्तू न वापरता घरगुती मसाले त्याचबरोबर शेव त्याठिकाणी तयार केल्याने ती मिसळ खमंगदार बनते. त्यामुळेच मिसळ खावी तर लय भारी अशाप्रकारे प्रतिक्रिया ग्राहकांच्या येत आहेत. दरम्यान प्रशांत शिंदे यांनी बुधवारी सेक्टर12 येथे नवीन शाखा सुरू केली.यावेळी मठाधिपती बह्मचैतन्य सदगुरू दिगंबर स्वामी महाराज, आमदार निलेश लंके, महापौर डॉ . कविता चौतमोल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम, नगरसेविका विद्याताई गायकवाड राजेंद्र चौधरी,दिलीप घुले,चंद्रकात राऊत,भाऊ पावडे,चंद्रकांत नवले, अशोक आहेर,प्रविण साबळे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या

लय भारीत …… झिंगाट
प्रशांत शिंदे यांच्या लय भारी मिसळ हाऊस मध्ये झिंगाट प्रकारची मिसळ अधिक फेमस आहे. तीसुद्धा खवय्यांच्या पसंतीस उतरली आहे. एकदा झिंगाट खाल्ली की दुसऱ्यांदा झिंगाट वर ताव मारायला आल्याशिवाय मिसळ खवय्यांना राहवतच नाही. सजवलेली ही मिसळ थाळी अधिकच लोकप्रिय झाली आहे.

“महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मिसळ हा पदार्थ अग्रक्रमाने खाल्ला जातो. अल्पोपहार म्हणून मिसळीला प्राधान्य दिले जातो. घाट माथ्यावरील चव लय भारीत आम्ही देतो. त्यामुळे खरोखरच गेल्या तीन वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून दुसरी शाखा बुधवारी सुरू केली. मी इंजिनिअरिंग केले असले तरी मला व्यवसायात रस होता. त्या माध्यमातून स्वतःबरोबरच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देता आला.मराठी तरुणांनी नोकरी ऐवजी व्यवसायाकडे वळावे हा संदेश यानिमित्ताने मी देत आहे.”
प्रशांत संभाजी शिंदे
लय भारी मिसळ हाऊस