पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे आशीर्वाद कडून कौतुक

 

 

अंबादास केदार यांचा सोसायटीतील रहिवाशांकडून सन्मान
वाशी खाडीत चाळीस वर्षीय व्यक्तीचा वाचवला होता जीव
पनवेल /प्रतिनिधी:- शनिवारी वाशी खाडी पुलावरून उडी मारून एका 40 वर्षीय व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या नवी मुंबई सागरी सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारीअंबादास केदार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीचा जीव वाचवला. केदार यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कामगिरीबद्दल ते राहत असलेल्या कळंबोली येथील आशीर्वाद सोसायटीच्या रहिवाशांनी अभिनंदन करून सन्मान केला.
22 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास. वाशी खाडी पुलावरून मुंबई लेनच्या बाजूने एका व्यक्तीने खाडीत उडी मारली. तो पाठीवर पडल्याने मोठा आवाज आला. याठिकाणी अनेकजण निर्माल्य टाकत असल्याने सुरुवातीला त्याकडे कोणाचेच लक्ष केले नाही. परंतु जास्त आवाज झाल्याने त्याच वेळी पनवेल लेन कडून सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस कर्मचारी अंबादास केदार आणि विजय करंदकर कर्तव्यावर होते. त्यांनी लगेच पलीकडच्या बाजूला धाव घेतली. दरम्यान त्या ठिकाणी एक दशक्रिया विधी सुरू होती. त्याचबरोबर दोन दिवसांपासून येथे एका मृतदेहाचा शोध सुरू होता. त्यामुळे लोक अगोदरच होते. परंतु नुकतीच भरती आल्याने खाडी परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते. त्यामुळे आत मध्ये कोणीही उतरायला तयार नव्हते. दरम्यान वरून उडी मारलेली तो माणूस पाण्यात बुडत होता. त्याला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न करीत नसल्याचे पाहून धावत धावत आलेल्या पोलीस कर्मचारी अंबादास केदार यांच्यातील माणूस, संवेदनशीलता आणि खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठता बाहेर आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोबाईल फोन बाजूला काढून ठेवला. आणि पाण्यात उडी घेतली. व त्या व्यक्तीला आत मध्ये जाऊन हात दिला. परंतु स्वतःची जीवन यात्रा संपवण्याच्या मानसिकतेमध्ये असलेला तो माणूस केदार यांना बचाव कार्याला प्रतिसाद देत नव्हता. मात्र आपली संपूर्ण ताकद वापरून कसेबसे त्या व्यक्तीला त्यांनी खाडी किनार्‍यापर्यंत आणले. दरम्यान या पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्या वेळात वाशी पोलिसांची बीट मार्शल आणि इतर कर्मचारी त्या ठिकाणी आले. संबंधितांना त्वरित वाशी येथील रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. दरम्यान कायदा आणि व्यवस्था राखणे इतक्या पुरतेच मर्यादित न राहता वेळप्रसंगी पोलीस आपल्या जीवावर उदार होत ते नागरिकांच्या मदतीला धावून जातात. वर्दी ही दर्दी होती है! त्याचा प्रत्यय शनिवारी वाशी खाडी येथे अनेकांना आला. केदार यांच्या कामगिरीचे समाज माध्यमांवर कौतुक झाले आहेच. त्याचबरोबर ते राहत असलेल्या कळंबोली येथील आशीर्वाद सोसायटीमधील रहिवाशांना सुद्धा त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. येथील रहिवाशी मोहन वाघ आणि इतरांनी अंबादास केदार यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा सन्मान केला.

“वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या ४० वर्षीय इसमास बुडत असताना पोलीस शिपाई अंबादास केदार याने खाडी मध्ये उडी मारून त्याचा जीव वाचवला. खरोखर त्यांची ही कामगिरी धाडसाची आहे. विशेष म्हणजे केदार हे आमच्या सोसायटीत राहात असल्याचा अभिमान आहे. पोलीस खात्यानेही त्यांच्या कामगिरीची दखल घ्यावी असे सामान्य नागरिक म्हणून मला वाटते.”
मोहन वाघ
रहिवासी आशीर्वाद गृहनिर्माण सोसायटी
कळंबोली