सिडकोची पंतप्रधान आवास योजना अडचणीत?


खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
पालकमंत्री आणि नगर विकास राज्यमंत्री झाले अवाक्
पनवेल/ प्रतिनिधी: – खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्टेशन समोरील जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प उभारला जाणार आहे. याला प्रवासी आणि रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री व नगर विकास राज्य मंत्र्यांसोबत रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. वस्तुस्थिती आणि लोक विरोध पाहता त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्याचबरोबर या प्रकल्पाबद्दल दोन्ही राज्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत त्वरित नगर विकास मंत्र्यांकडे बैठक लावावी अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.
सिडकोने रेल्वे स्टेशन समोरील जागा त्याचबरोबर बस आणि वाहनतळ याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत इमारती बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्टेशन समोरील परिसरातही समावेश आहे. याठिकाणी दोन महिन्यांपूर्वी सिडकोने पत्रे लावले. दरम्यान येथे वाहनतळ तसेच समोरील मैदान इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 92 हजार घरे सिडको बांधणार आहे. याकरता आठशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. परंतु पार्किंग, मैदान आणि वाहन बस तळ या करीता राखीव असलेल्या जागांवर प्राधिकरणाने इमारती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत सर्वसामान्यांकरीता सिडकोने घरे बांधावीत याला आमचा विरोध नाही. मात्र हा प्रकल्प दुसऱ्या भूखंडावर करावा अशी मागणी कामोठे येथील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत. यासंदर्भात कामोठे नागरी हक्क संरक्षण समितीने खासदार सुनील तटकरे यांना साकडे घातले होते. त्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी रविवारी खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्यासमवेत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिक्षक आमदार बाळाराम पाटील होते. खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्टेशन समोर 10 मीटर चा रस्ता आहे. त्यापैकी एक लेनवर रिक्षा उभ्या राहतात. बाकी प्रवासी आणि नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना खेळाची मैदान, उद्यान या साठी जागा सोडावेत म्हणून आम्ही विशेष प्रयत्न केले. सिडकोने या सुविधां नागरिकांना देणे आवश्यक आहे. त्या का दिल्या जात नाहीत अशीही सिडको अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. रेल्वे स्टेशन समोरील या जागांवर पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे बांधणे कोणत्या नियमात बसते असा सवालही उपस्थित केला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शिनगारे आणि मुख्य अभियंता चौटालीया यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केले. आम्ही या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन केले आहे. त्याचे सादरीकरण करू असे अधिकाऱ्यांनी सांगताच. पहिली वस्तुस्थिती पहा मग सादरीकरण करा अशा शब्दात तटकरे यांनी त्यांना फटकारले. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रंजना सडोलीकर, अरुण भिसे, अमोल शितोळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, सल्लागार बबन दादा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे , माजी नगरसेवक शिवाजी थोरवे , राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भाऊ पावडे, चंद्रकांत नवले,विधी तज्ञ सुलक्षणा जगदाळे,मंगेश अढाव  यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी उत्तम नियोजन केले होते.

रेल्वेस्थानका समोरच हा प्रकल्प का?
नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही रेल्वे स्टेशन समोर असलेल्या या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सिडको अधिकाऱ्यांना विचारणा केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते त्यातच रिक्षा खाजगी वाहने येथे येणार. फेरीवाल्यांचा ही समावेश असेल येथे इमारती उभारल्यास या सर्वांनी जायचे कुठे असाही प्रश्न तनपुरे यांनी विचारला. आणि याठिकाणी मल्टी पर्पज पार्किंग बाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही जनभावनेचा शासन आदर करेल अशी ग्वाही दिली.

या प्रकल्पाला त्वरित स्थगिती द्या
याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी बैठक लावण्यात यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्र्यांकडे जन भावना पोचवा. या प्रकल्पाला त्वरित स्थगिती द्या अशा प्रकारच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे आणि नगर विकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांना दिल्या.