आमदार सतरंजीवर…. कार्यकर्ते गादीवर

 

 

अकाशवाणीतील  आमदार निवासातील वेगळेपणा
आमदार निलेश लंके यांचा साधेपणा मुंबईतही
नाना करंजुले
मुंबई/ प्रतिनिधी: कार्यकर्त्यांनी कायम सतरंज्या उचलायच्या का! हे राजकीय वाक्य कायम कानावर पडत! कारण अनेकदा तसं म्हणण्याची वेळ नेते आपल्या कार्यकर्त्यांवर आणतात. परंतु पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांच्या बाबतीत नेमके उलटे आहे. कायम कार्यकर्त्यांचा गराडा असलेल्या या आमदाराचे पाय आजही जमिनीवर आहेत. विशेष म्हणजे आमदार निवास मध्ये कार्यकर्ते बेड वर म्हणजेच गाडीवर झोपतात. आणि आमदार महोदय मात्र खाली सतरंजीवर गावाप्रमाणे एक दोन तास आराम करतात. त्यांचा हा साधेपणा आमदार निवासात ही चर्चिला जात आहे.
आमदार निलेश लंके आणि जनता हे एक समीकरण पारनेर नगर मध्ये आहे.24 तास 365 दिवस सर्वसामान्यांकरीता काम करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला चक्क जनतेने डोक्यावर घेतले. निवडणुकीच्या अगोदर 19 दिवस त्यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली. प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या. शेताच्या बांधावर जेवण घेतले. गावातील नळावर आंघोळ केली. आणि मंदिर तसेच चावडीवर मुक्काम केला. निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवला. आणि जनतेलाच आमदार झाल्यासारखे वाटले. मला कोणी साहेब म्हणू नका!. तुमचा मी सालकरी गडी आहे. हक्काने या गड्याला काम सांगा! नाही ऐकले तर ओरडून सांगा वेळप्रसंगी दम द्या असे आ . लंके जनतेला सांगतात. बडेजावपणा, डामडौल हा आमदार झाल्यानंतर ही त्यांच्यात दिसला नाही. जमिनीवर पाय ठेवत ते आजही 24तास लोकांमध्ये वावरताना दिसत आहेत. फोन शक्य तितका स्वतःच पूर्वीप्रमाणे उचलतात. तिकडे जातील तिकडे कार्यकर्त्यांचा गराडा कायम दिसतो. जे मिळेल ते खायचे आणि कायम मतदारसंघातील विकासाचा ध्यास घेत जनसामान्यांचे प्रश्न सोडवायचे हा एक कलमी कार्यक्रम पारनेर नगरकरांच्या आमदाराचा सध्या सुरू आहे. ते मुंबईतही गावाप्रमाणेच राहतात. आमदार लंके यांना फाइव स्टार आलिशान हॉटेलमध्ये झोप लागत नाही. आणि तेथील अन्नही गोड लागत नाही. चहा, वडापाव, भेळ आणि चायनीज ची टपरी वर बसून चहा आणि नाश्ता करण्यात आजही त्यांना रस आहे. पत्र्याच्या घरात राहणार आमदार महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला आहे असे वाटत नाही. मात्र आमदार निलेश लंके आजही अशाच घरामध्ये राहतात. हा त्यांचा साधेपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला आर आर पाटील यांच्यानंतर खऱ्या अर्थाने भावला आहे. शासनाने त्यांना आकाशवाणी आमदार निवासात फ्लॅट दिला आहे. याठिकाणी कायम कार्यकर्त्यांची गर्दी दिसते. आमदार महोदय या सर्व कार्यकर्त्यांसोबत दाटीवाटीने झोपतात. याठिकाणी असलेल्या बेड आणि गादीवर ते आज तागायत झोपलेत नाहीत. ही जागा मतदारसंघातून मुंबईला येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकरीता त्यांनी जणूकाही आरक्षित ठेवली आहे. आमदार निलेश लंके मात्र खाली सतरंजीवर झोपत असल्याने त्यांच्यातील साधेपणा अजिबात कमी झाला नाही हे दिसून येते. ते कितीही उच्चपदावर गेले तरी जमीन कधीच सोडणार नाहीत. अशा प्रतिक्रिया सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी ऑनलाइन बातमीकडे नोंदवल्या आहेत.