घणसोलीतील अनैतिक संबंधाला खुनाचे ‘रक्त’

 

क्लिष्ट गुन्हयाची नवी मुंबई गुन्हे शाखेकडून उकल
कक्ष क्रमांक तीनच्या पथकाची कामगिरी
मृतदेहाची ओळख पटून तीन आरोपींना  घातल्या बेडया
नवी मुंबई  /प्रतिनिधी:-अनैतिक संबधातुन आपल्या
प्रियसीच्या पतीची मित्रांच्या सहाय्याने हत्या केल्याचा गुन्हा नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक तीन ने उघडकीस आणला आहे. ऐरोली खाडीत फेकून दिलेल्या या मृतदेहाची ओळख पटवून त्यानंतर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत या क्लिष्ट प्रकरणाची उकल केली. आणि मुख्य आरोपी व त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली हा कौशल्यपुर्ण तपास करण्यात आला असल्याची माहिती कक्ष क्रमांक तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या हद्दीतील खाडी परिसरात १३ फेब्रुवारी २०२० रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आलेला होता . संबंधित व्यक्तीचा गळा तीक्ष्ण हत्याराने चिरलेला असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले . तसेच मृताच्या डोक्यावर , हातावर तीक्ष्ण हत्याराचे वार आल्याचे दिसून आले . सदर घटनेच्या अनुषंगाने एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल करण्यात आला.पोलीस आयुक्त संजयकुमार, सह . पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर , गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस उपायुक्त प्रविणकुमार पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा कक्ष तीनने समांतर तपास सुरू केला . तपासादरम्यान नवी मुंबई तसेच आजुबाजुचे आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली . याबाबत माहिती घेत असतांना गुन्हयातील मयत अनोळखी व्यक्तीचे वय व वर्णनाशी मिळते जुळते कोणी हरविलेबाबत नोंद आहे काय? याबाबत तपास करण्यात आला. त्यादरम्यान रबाळे पोलीस ठाण्यात एक व्यक्ती मिसिग असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. खडकबहादुर सिंग (४५ ) , रा . सदगुरू सोसायटीचे मागे , दत्तनगर , घणसोली असे त्याचे नाव होते. हे सर्व वर्णन ऐरोली खाडीत सापडलेल्या मयत अनोळखी व्यक्तीशी साधारणतः मिळते – जुळते वाटले. त्या अनुषंगाने खडकबहादुर सिंग यांची पत्नी , मुले यांच्याकडे सखोल तपास गुन्हे शाखेने केला. त्यांना मयत व्यक्तीचे छायाचित्र दाखवण्यात आले. मृत व्यक्तीचे कपडे व कमरेला लावलेला बेल्ट पाहुन खडकबहादुर सिंग हे मिसींग झाले त्या दिवशी त्याच्या अंगावर नमुद कपडे व कमरेला असलेला बेल्ट असाच होता असे त्याचे कुटंबीयांनी सांगितले. त्यांना सदर गुन्ह्यातील मृतदेह दाखवण्यात आला. त्यांनी मयताची शरीर प्रकृती व तोंडाचे पुढील वरचे तुटलेले दात पाहुन मृतदेह खडकबहादुर सिंग यांचा असल्याचे ओळखले. मृतदेह कोणाचा आहे हे समजले असले तरी यानंतरही त्याची हत्या कोणी व का केली असावी हा मोठा प्रश्न गुन्हे शाखेच्या तपास टीम समोर होता. त्यांनी नातेवाईकांकडे व परिसरात सखोल कौशल्यपुर्ण आणि तांत्रीक तपास केला. गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सदरचा गुन्हा हा कैलाश शालीग्राम खरात (२९ ) , रा . घणसोली , नवी मुंबई ,जय शंकर चव्हाण , वय (२५ ), रा . नौसील नाका , रबाळे , नवी मुंबई , वली अहमद मशकअली सय्यद , (२० ) , रा . नौसील नाका , रबाळे , नवी मुंबई यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले . या आरोपींना गुन्हे शाखेच्या कक्ष तीनच्या तपास पथकाने शुक्रवारी नौसील नाका , रबाळे , नवी मुंबई येथुन शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक तपासांत आरोपी कैलास खरात याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असलेचे उघड झाले. मृत्यू व्यक्ती त्यांच्या संबंधांना अडसर असल्याने खरात याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने खडकबहादुर सिंग यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून काटा काढला. डोक्यावर , पाठीवर व हातावर वार करुन हत्या केली.व मृतदेह ऐरोली खाडीत फेकुन दिल्याची कबुली त्यांनी दिली . या आरोपींना अटक करून कक्ष क्रमांक तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व त्यांच्या पथकाने सदरचा क्लीष्ट व गंभीर गुन्हा उघडकीस आणला . या तपासामध्ये कादबाने यांच्यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे , मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे , कक्ष – ०३ , गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे , मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेच्या एपीआय राणी काळे , तसेच पोलीस अंमलदार शरद भरगुडे , शेखर वक्टे , प्रविण बावा , गौतम कांबळे , कृष्णा मोरे , सचिन सुभे , उमेश नेवारे , संदीप वाघमोडे , किशोर बोरसे , सुधीर पाटील , तुकाराम सोनवलकर यांनी सहभाग घेतला आहे . गुन्हयांचा पुढील तपास एनआरआय सागरी पोलीस ठाणे करीत आहेत .