कासाडी नदीत मासेमारीला पुन्हा ऊर्जितावस्था

 


नदीतील प्रदूषण कमी झाल्याने माशांची पैदास
काँग्रेस पर्यावरण सेल कडून मासेमारीसाठी होडी भेट
पनवेल /प्रतिनिधी:- कासाडी नदीत प्रदूषण कमी झाल्याने आता माशांची पैदास होऊ लागली आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा चालना मिळण्याची चिन्ह दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोडपाली येथील विलास कडके या कोळी बांधवाला काँग्रेस पर्यावरण सेलचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांनी रविवारी होडी भेट दिली.
शिरवली च्या डोंगरांमधून कासाडी नदीचा उगम होतो. तळोजा एमआयडीसी तुन या नदीचे पात्र जाते. पुढे कासाडी नवी मुंबई खाडीला जाऊन मिळते. दरम्यान स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कासाडी नदीमधून मोठ्या मच्छव्यातुन दक्षिण मुंबईला कौल, रेती, पेंढा, मीठ, भात तसेच विटांची वाहतूक केली जात असे त्यावेळी नावडे येथील गणपतशेठ पाटील यांच्या मालकीचा मच्छवा होता. त्यावर रोडपाली चे कोळी बांधव खलाशी म्हणून काम करत असे त्याचबरोबर या ठिकाणी मासेमारी सुद्धा केली जात असे. मात्र तळोजा एमआयडीसी सुरू झाल्यानंतर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी सोडले जाऊ लागले. सिईटीपी प्रकल्प नादुरुस्त अवस्थेत असल्याने नदीच्या पात्रातील पाणी प्रदूषित होते. त्यातच भरती आणि ओहोटी मुळे खाडीत सोडलेले रसायनमिश्रित पाणी ते कासाडी नदीत येत असे त्याचबरोबर सीईटीपी मध्ये साचलेला गाळ नदीपात्रात येत असल्याने मोठ्या प्रमाणात कासाडीची नासाडी झाली होती. याचा त्रास आजूबाजूच्या गावात बरोबर वसाहतींना होत होता. उग्र वास येत असल्याने रोडपाली आणि नावडे येथील रहिवासी त्रस्त होते. तसेच नदीचे पात्र प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम जलचरांवर झाला. विशेष करून मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत होते. रसायनमिश्रीत पाण्यामुळे माशांची पैदास होत नव्हती. परिणामी मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान प्रदूषण मुक्त कासाडी नदी ही चळवळ रोडपाली येथील कोळी बांधव पर्यावरण प्रेमी योगेश पगडे यांनी सुरू केली. त्यासाठी शासकीय पातळीवर अनेक पत्रव्यवहार केले. तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा केला. त्यांची दखल तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतली. त्यानंतर सीईटीपीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. तसेच हा प्रकल्प एमआयडीसीकडे देखभालीसाठी देण्यात आला. सध्या सीईटीपी प्रकल्पाचे अपग्रेडेशन सुरू आहे. नूतनीकरणामुळे बऱ्याच अंशी सकारात्मक परिणाम झाला आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाची करडी नजर असल्याने या पात्रामध्ये रसायनमिश्रित सांडपाणी पूर्वीप्रमाणे सोडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. याविरोधात वसाहतींमधील रहिवाशांनी सुद्धा आवाज उठवला. याचा एकत्रित परिणाम चांगला झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान मासेमारी करणाऱ्या विलास कडके यांना पूर्वीप्रमाणे मासे सापडले. यावरून माशांची पैदास वाढल्याचे दिसून आले. परंतु त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची होडी नसल्याने मासेमारीस अडचणी येत होत्या. या होतकरू कोळी बांधवाला योगेश पगडे यांनी काँग्रेस पर्यावरण सेलचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याकडून होडी उपलब्ध करून दिली . याअगोदर राम के कंपनीने कासाडी नदी स्वच्छ करण्यासाठी पगडे यांना होडी भेट दिली होती.
दरम्यान रोडपाली येथे झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम कदम, पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांच्यासह स्थानिक कोळी बांधव उपस्थित होते.या होडीच्या माध्यमातून मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेलच. तसेच कासाडी नदीत पडलेला कचरा काढून पात्र स्वच्छ ठेवण्याकरीता प्रयत्न करीन असे होडी प्राप्त कोळी बांधवाने सांगितले.