जागतिक महिला दिनानिमित्त योगाभ्यास

 

 


कामोठेत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन
शिवसेना महिला आघाडी व अस्मिता सामाजिक महिला संस्थेचा उपक्रम
पनवेल/ प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला आघाडी आणि अस्मिता सामाजिक महिला संस्था यांच्यावतीने रविवारी कामोठे येथे योगा अभ्यास आणि कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसाहतीतील महिलांनी उपस्थित राहून योग आणि कायद्या विषयी माहिती घेतली. या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
विशेष करून चाकरमानी महिलांना घर सांभाळून नोकरी करीत असताना त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. शारीरिक व्यायाम नसल्याने काही व्याधी जडतात. त्याचबरोबर गृहिणींना सुद्धा वेळ मिळत नाही. घरातील महिलेचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब सदृढ राहते. स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी व अस्मिता महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेनेच्या महिला शहर संघटक अॅड सुलक्षणा जगदाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेतला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील उद्यानात योगाभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षिका डॉ सुनिता पाटील यांनी उपस्थित महिलांना योग प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. सर्वांनी त्यांच्यासोबत वेगवेगळे आसन तसेच प्राणायाम केला. यापुढे दररोज योगा करण्याचा संकल्प उपस्थित सावित्रीच्या लेकींनी केला. याशिवाय महिलांना कायदेशीर बाबींची माहिती नसते. महिलांविषयी अनेक कायदे करण्यात आले आहेत त्याबाबत त्या अनभिज्ञ असतात. परिणामी त्यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडता येत नाही. कित्येक भगिनी अन्याय निमूटपणे सहन करतात. कौटुंबिक हिंसाचार त्याचबरोबर इतर अत्याचार त्यांचावर होता. त्यामुळे महिला भगिनी कायदेशीर रित्या जागृत झाल्या पाहिजे. त्यांना कायदेविषयक माहिती असावी यासाठी रविवारी कायदेशीर मार्गदर्शनही त्यांना करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड जयश्री अकोलकर त्यांनी कायदे विषयी इतंभूत माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका शिवसेनेच्या शहर संघटिका अॅड सुलक्षणा जगदाळे , शिवसेनेच्या पनवेल विधानसभा संघटक रेवती सपकाळ, कामोठे शहर संपर्क संघटक मिना सादरे , प्रभाग 12 च्या पदाधिकारी संगीता राऊत, सोनल तांबे, दिक्षा लवंगारे,संगिता, पवार व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.