पनवेल – नवीन पनवेल सब – वे उजेडाच्या प्रतीक्षेत

 

 


पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे जाळे
प्रभाग समिती सभापतींचे सिडकोकडे पाठपुरावा सुरू
पनवेल /प्रतिनिधी: – पनवेल आणि नवीन पनवेल जोडणारा पोदी येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु रात्रीच्या वेळी येथे अंधाराचे जाळे पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात प्रभाग समिती डचे सभापती तेजस कांडपिळे यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रही दिले आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावे अशी मागणी कांडपिळे यांनी केली आहे.
 नवीन पनवेल आणि पनवेल ला जोडणारा एचडीएफसी सर्कल येथून मार्ग आहे. नवीन पनवेल उड्डाणपुलावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने या भागात वाहतूक कोंडी असते. दोन्ही बाजूने वाहनांच्या अनेकदा रांगा लागतात. त्यामुळे एचडीएफसी सर्कलवर कित्येकदा अडकून पडावे लागते. तर दुसरा मार्ग पोदी येथून आहे. पोदीवरून पनवेलला जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडावा लागत असे. याठिकाणी उड्डानपुल नसल्याने रेल्वे जाईपर्यंत वाट पाहावी लागत होती. एक गाडी आल्यानंतर दुसरी गाडी लगेच येत असल्याने खूप वेळा अर्धा-पाऊण तास फाटक बंद राहायचे. त्यामुळे याठिकाणी फाटक उघडेपर्यंत उभे राहावे लागत होते. यामधून वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता . तसेच मानसिक त्रासही होत होता. या पार्श्वभूमीवर सिडकोने पोदी येथे रेल्वे लाईनच्या खालून भुयारी मार्ग तयार केला. यासाठी दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. रेल्वेचा कोणताही मेगाब्लॉक न अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत, युद्धपातळीवर या सब वे चे काम सिडकोने पूर्ण केले. काही महिन्यांपूर्वी हा मार्ग लोकार्पण करण्यात आला. तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान
नवीन पनवेल मधील सेक्टर १५ , १५ ए १६ ,पोदी , विचुंबे, येथील रहिवासी या भुयारी मार्गाचा वापर करतात. त्यामुळे एचडीएफसी सर्कल जवळील उड्डाणपुलावरील वाहनांची वर्दळ काही प्रमाणात कमी झाली आहे. वाहतूक कोंडी पूर्वी प्रमाणे होत नसल्याचे दिसून येत आहे. या सर्व सकारात्मक गोष्टी घडल्या असल्या तरी पोदी याठिकाणी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गावर दिवाबत्तीची कोणतीही सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी याठिकाणी अंधार पसरतो. यामुळे येथून जात येत असताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरी सारख्या घटना घडू शकतात. तसेच दुसऱ्याही अप्रिय प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे. एकंदरीतच भुयारी मार्ग जरी वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी तो विजेअभावी असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सिडकोकडून कोणत्याही उपायोजना झाल्या नसल्याचे पाहून प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पनवेल नवीन पनवेल ला जोडणाऱ्या या भुयारी मार्गावर त्वरित पथदिवे बसून ते कार्यान्वित करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.

“पोदी भुयारी मार्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली नाही. रात्रीच्या वेळी येथे अंधार पसरलेला असतो . या अंधाराचा फायदा घेवून या परिसरात गैरकृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे या रस्त्यावरुन जाये करताना असुरक्षितता निर्माण झालेली आहे. प्रवास करणा – या महिला वर्ग व जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मी तिकडे पाठपुरावा करत आहे.”
तेजस कांडपिळे
सभापती
प्रभाग समिती ड