पारनेर तालुक्यातील कॅनाॅलला पाणी सुटले

 

कुकडी व पिंपळगाव जोगा धरणातील आवर्तन सुरू
आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश
पारनेर/ प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्याने विहिरी आणि कूपनलिकेचे भूजल पातळी कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिकं सुकु लागली आहेत. तसेच पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून कुकडी कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी पारनेर- नगरचे आमदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुद्धा केला होता. त्याची दखल घेत कुकडी आणि पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कुकडी आणि पिंपळगाव जोगा धरणातून जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या मुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. तसेच यामुळे दुष्काळ निवारण सुद्धा झालेले आहे. दरम्यान या धरणात पाऊस झाला तर त्याचा फायदा या चार तालुक्यांना होतो. सुदैवाने यावर्षी धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सिंचन क्षेत्रातही यंदा पावसाचे प्रमाण चांगले होते. असले तरी गेल्या काही दिवसांपासून ऊन वाढू लागले आहे. तसेच भूजल पातळी कमी झाल्याने पिकांसाठी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावून जातो की काय अशा विवंचनेत पारनेर तालुक्यातील शेतकरी होते. जर आवर्तन सोडले गेले. तर उन्हाळी पिके नक्कीच वाचतील हा मुद्दा आमदार निलेश लंके यांनी पाटबंधारे विभागाकडे लावून धरला. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरही पाठपुरावा केला. तसेच अधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रप्रपंच केला. या रास्त मागणीची दखल घेत शेवटी कुकडी आणि पिंपळगाव जोगा या धरणातून आवर्तन सोडण्यात आले.
कुकडी डावा कालव्यातून ४४ दिवसांचे आवर्तन शुक्रवारी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे पिंपळगाव जोगा धरणातूनही उन्हाळी आवर्तन पारनेर तालुक्यातील गावांना शेतीसाठी सोडण्यात आले आहे. याचा फायदा उन्हाळी कांदा , भुईमूग , वाटाणा या पिकांसह‌ फळबागांना होणार आहे.या अवर्तनाचा फायदा शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पण होणार आहे. त्याबद्दल पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच आमदार निलेश लंके यांनी केलेल्या पाठवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

.