रायगड क्रिकेटरस संडेला दुबई रिटर्न?

 

 

पनवेलमधील पंधरा खेळाडूंचा समावेश
करोनाच्या या पार्श्वभूमीवर तपासणी होणार
पनवेल /प्रतिनिधी:- रायगड जिल्ह्यातून क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी जवळपास 50 स्थानिक खेळाडू दुबईला गेल्याचे समजते. दरम्यान ते रविवारी परतणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात जितके करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी बहुतांशी दुबई रिटर्न्स आहेत. त्यामुळे सहाजिकच त्याठिकाणी गेलेल्या रायगडच्या खेळाडूंची करोना तपासणी केली जाणार असल्याची माहितीही विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
देशभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीन सह इतर देशांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि अहमदनगर या शहरांचा समावेश आहे. दरम्यान जितके रुग्ण या ठिकाणी सापडली आहेत. त्यापैकी बहुतांशी हे दुबईहून परत आलेले आहेत. यावरून दुबईमध्ये करोनाचा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ठिकाणचा संसर्ग हा भारतात पसरल्याचे ही दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातून पन्नास स्थानिक क्रिकेट खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी दुबई ला गेलेले आहेत. त्यापैकी काहीजण हे पनवेल येथील आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तसेच दुबई आलेल्या काहींना या रोगाची लागण झालेले असल्याने दुबईहून येणार्‍या रायगड जिल्ह्यातील या खेळाडूंची तपासणी करण्यात येणार आहे. परतल्यानंतर त्यांना स्वतंत्र ठेवण्यात येणार असल्याचे समजते. तपासणी होऊन रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना घरी पाठवले जाण्याची शक्यता आहे.
चौकट
ग्राम विकास भवन मध्ये ठेवण्याची शक्यता
क्रिकेट खेळण्याकरिता गेलेल्या या खेळाडूंना मुंबई विमानतळावरून त्वरित स्वतंत्र ठिकाणी नेण्याची शक्यता आहे. दम्यान खारघर येथील ग्राम विकास भवन मध्ये त्यांना ठेवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तेथेच तपासणी केली जाणार असल्याचे समजते. भारत -दुबई विमानसेवा बंद आहे. परंतु ज्यांचे रिटर्न तिकीट आहेत. त्यांना भारतात दुबईहून आणण्यात येणार आहे. त्यामध्ये रायगडच्या स्थानिक क्रिकेटपटूंचा समावेश असल्याचे समजते.

.