आ.निलेश लंकेंना मिळाली पवारांची राजकीय आत्मकथा


शरद पवार यांच्याकडून वाढदिवसाची भेट
मुंबई/ प्रतिनिधी:- आमदार निलेश लंके यांचा दहा मार्च रोजी वाढदिवस झाला. यानिमित्ताने मुंबई येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. इतकेच नाही तर पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ हे आपले राजकीय आत्मकथा असणारे पुस्तक भेट दिले. आ.लंके यांनी अतिशय आनंदाने ते स्विकारून मोठ्या साहेबांचे आशीर्वाद घेतले.
आमदार निलेश लंके हे लोकवर्गणीतून निवडून आलेले आमदार आहेत. जनतेशी नाळ असलेला आमदार अशी त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी शरद पवारांच्या गुड बुकात आपली जागा मिळवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पारनेर येथे झालेल्या प्रचार सभेत “निलेश गरीब जरूर आहे. परंतु तो प्रामाणिक आणि परोपकारी आहे” असे गौरवोद्गार पवार यांनी काढले होते. निवडून आल्यानंतर बारामती येथे आमदार निलेश लंके यांनी मोठ्या पवारांची भेट घेतली होती.अपेक्षा पेक्षा जास्त मताने निवडून आल्याबद्दल विक्रमादित्य अशी उपाधी त्यांनी दिली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेला दुसरा आर. आर . आबा अशा शब्दात आ.लंके यांना मोठ्या साहेबांनी पावती दिली होती. त्यानंतर पारनेर नगरचे आमदार पाचशे कार्यकर्त्यांना घेऊन दिल्ली येथील 6 जनपथ वर गेले होते. अहमदनगर जिल्ह्यातील के. के. रेंज विस्तारीकरणाच्या विरोधात पवारांना साकडे घालण्यात आले. त्यावेळी सर्वांचे आदरातिथ्य त्यांनी केले. सुप्रिया सुळे आणि त्यांनी सर्वांना वेळ दिला. पारनेर – नगरकरांशी संवाद साधला. दरम्यान मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी आ.निलेश लंके यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
आणि लोक माझे सांगाती हे पुस्तक भेट दिले. तुमची भावी राजकीय व सामाजिक वाटचाल अशीच बहरत जावो. मतदार संघासह संपूर्ण महाराष्ट्राच्या दिनदलित,गरीब जनतेची सेवा तुमच्या हातून घडो अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सत्काराला फाटा देत समाजोपयोगी उपक्रमाद्वारे शालेय साहित्य व गोरगरिबांना उपयोगी येतील अशा जीवनावश्यक वस्तू स्विकारल्या म्हणून पवारांनी आमदार निलेश लंके यांचे तोंडभरून कौतुक केले.