लोकल मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तूचा निनावी फोन

 


पनवेल रेल्वे स्टेशन आणि लोकलची तपासणी
कोणतीही संशयित वस्तू हाती लागली नाही
पनवेल प्रतिनिधी: – मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून पनवेलकडे आलेल्या लोकल गाडीमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचा रविवारी सकाळी निनावी फोन आला. त्यानुसार बॉम्ब शोधक पथक , अग्निशमन दल, आर पी एफ, लोहमार्ग पोलीस पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्याठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. परंतु संशयास्पद कोणती वस्तू आढळली नाही.
सकाळी नऊ वाजता पनवेल रेल्वे स्थानकाकडे आलेल्या लोकलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचा फोन रेल्वेच्या नियंत्रण कशाला आला. त्यानंतर त्वरित सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक पथक काही मिनिटातच पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवानही तेथे आले. लोहमार्ग आणि आर पी एफ चे कर्मचारी रेल्वे स्थानकावर अगोदरच होते. दरम्यान एक आणि दोन क्रमांकाचे फलाट पूर्णपणे रिकामे करण्यात आले. आणि या ठिकाणी लागलेल्या लोकल गाडीमध्ये तपासणी करण्यात आली. परंतु आत मध्ये काही आढळून आले नाही. निनावी फोन करणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रसिद्धी माध्यमांचे छायाचित्रकार त्या ठिकाणी पोहोचले. परंतु त्यांना फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. अशाप्रकारे फोन का करण्यात आला. किंवा अशी वस्तू खरंच ठेवण्यात आली होती का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. परंतु प्रथम दर्शनीय ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.