करोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपायोजनाचा आढावा

 


आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली पनवेल महापालिका आयुक्तांची भेट
पनवेल /प्रतिनिधी: करोना व्हायरस मुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल परिसरातही कामोठे येथे एक रुग्ण आढळला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. आणि यासंदर्भात मनपाने केलेल्या उपाययोजना आढावा घेतला. तसेच महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या.

चीन , इटली , दक्षिण कोरिया , स्पेन , इराण , फ्रान्स , दुबई या करोना विषाणू बाधित देश आहेत . या ठिकाणाहून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे . तसेच शासकीय यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. राज्यात जितके करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बहुतांशी दुबई रिटर्न आहेत. कामोठे वसाहतीत सुद्धा एक करोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉस्पिटल पासून दूर अंतरावर स्वतंत्र कक्षांची संख्या वाढवण्यात येत आहे. दरम्यान पनवेल हे मुंबईपासून जवळच आहे. तसेच कॉस्मोपॉलिटन शहर आहे. याव्यतिरिक्त परदेश वारी करून येणारे नागरिक सुद्धा जास्त आहेत. नुकतेच दुबई शारजा याठिकाणी क्रिकेट स्पर्धा खेळून रायगडातील क्रिकेटर्स परतले आहेत. त्यांची पनवेल उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयांमध्ये देखरेखीसाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय कोन येथे इंडिया बुल्स रेंटल होम करोना विलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेत जाऊन गणेश देशमुख यांची भेट घेतली. आणि पनवेल महानगर क्षेत्रात नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचा आढावा घेतला. तसेच मनपा आयुक्तांना त्यांनी काही सूचनाही केल्या. दरम्यान महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. तसेच जलतरण तलाव, सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले असल्याचे ते म्हणाले. महापालिका प्रशासन पूर्णपणे दक्ष असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.यावेळी महापौर डाॅ कविता किशोर चौतमोल,नगरसेवक अनिल भगत उपस्थित होतो.