पनवेल मधील दहापैकी नऊ रुग्ण करोना निगेटिव्ह

 


कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एका पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू
ग्राम विकास भवनातील कक्षामध्ये परदेशी वारीतील 39 नागरिक
पनवेल/प्रतिनिधी: – पनवेल परिसरात करोना रोगाचे लक्षण आढळून आलेल्या 10 रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 9 जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान खारघर येथील ग्राम विकास भवन मध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी परदेशवारी करून आलेल्या 39 नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्यांना त्याठिकाणी मनपाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आहेत . खारघर येथील ग्रामविकास भवनात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तेथे परदेशातुन आलेल्या ३९ नागरीकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . या नागरीकांना नाष्टा , जेवण , स्वातंत्र बेड , टॉवेल , नॅपकीन , साबण इत्यादी आवश्यकत्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत . रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी , महापालिका आयुक्त गणेश देशमुख , ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक , पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले , तहसीलदार अमित सानप , पनवेल महानगरपालिकेचे उपआयुक्त संजय शिंदे यांनी मंगळवारी ग्रामविकास भवनाला भेट देऊन पाहणी केली. परदेशातुन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या नागरीकांची त्यांच्या घरी जाऊन वैद्यकीय अधिकारी आरोग्य तपासणी करीत आहेत. तसेच ताप , खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले . करोनाची लक्षणे आढळल्यास अशा पेशंटला कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले जाते . आतापर्यंत पनवेल महानगरपालिकेने १० जणांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते . त्यापैकी ९ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला असून एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आला आहे . त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अॅब्युलन्स ड्रायव्हर , त्याचे नातेवाईक यांची तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्वाचे वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आले आहेत . दुबईहून आलेले क्रिकेट खेळाडु ते ज्या जिल्ह्यातील आहेत त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या बाबात काळजी घेण्यासाठी लेखी कळविण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दवाखान्यात परदेशातुन आलेले जे नागरीक उपचार घेत आहेत. त्यांची माहिती पनवेल महानगरपालिकेला तात्काळ कळविण्याचे सुचित करण्यात आले आहे. तसेच हॉटेल मध्ये राहीलेल्या नागरीकांना स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या सुचना देण्यात आले आहेत

गर्दीची ठिकाणे, कामगार नाके आणि आठवडे बाजार बंद राहणार
महापालिका क्षेत्रातील गर्दीची ठिकाणे , कामगार नाके , आठवडी बाजार बंद करण्याबाबत प्रभाग क्षेत्रिय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत . जेणेकरून करोना विषाणूंचा फैलाव होणार नाही. याची खबरदारी घेण्यात आली आहे.

इतर दुकान बंद करण्याच्या सूचना
जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने उदा . बेकऱ्या , दुग्धजन्य पदार्थ , भाजीपाला , फळे या व्यतीरीक्त सर्व दुकाने बंद करण्याबाबत संबंधितांना कळविले आहे . शहरातील नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता स्वत : च्या कुटुंबात राहुन कुटुंबासह आनंद घ्यावा . तसेच गर्दी टाळुन आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे . असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचा आदेश
जिल्हाधिकारी , रायगड यांनी दिनांक १८ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) नुसार जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे . त्यानुसार पनवेल परिसरात तशा सूचना करण्यात आल्या आहेत.