कळंबोली स्टील मार्केटवरही करोनाची बंदी

 


31 मार्चपर्यंत लोखंड पोलाद बाजारपेठ बंद राहणार
असोसिएशनच्या सयुक्त बैठकीत एकमुखी निर्णय
पनवेल/ प्रतिनिधी: – कळंबोली येथील आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिल मार्केट 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व असोसिएशनने एकत्रित येऊन शुक्रवारी हा निर्णय घेतला. तसे पत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे. यामुळे व्यापारी, वाहतूकदार आणि माथाडी कामगारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. असे असले तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कळंबोली येथील 302 हेक्टर जमिनीवर 125 , 250, 450, 900 चौ.मी अशा वेगवेगळया आकाराचे 1960  भूखंड पाडण्यात आले. 1980 साली सिडकोने भाडे करार करून लीज तत्वावर  हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. याठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठे लोह पोलाद मार्केट उभारण्यात आले आहे . मुंबईतून हे मार्केट कळंबोली या ठिकाणी आणण्यात आले. येथून लोह पोलादाचा व्यापार केला जातो. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून लोखंड स्टील मार्केट मध्ये आणले जाते. वॅगन मध्येही स्टील बाजारात येते. लोखंडाच्या प्लेट त्याचबरोबर सळई, अँगल याठिकाणी उतरवले जातात. तसेच कळंबोली येथील लोह पोलाद बाजारातून इतरत्र पाठवले जाते. याठिकाणी लोखंडांची खरेदी-विक्री होते. तसेच मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. याव्यतिरिक्त या बाजारात लोखंडाची कटिंग केली जाते. या भागात मोठे कटर्स आहेत. कळंबोली बरोबरच तळोजात सुद्धा लोखंडाचे कटिंगचे वर्कशॉप आहेत. एकंदरीतच येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. याशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रक, कंटेनर लोहपोलाद मार्केटमध्ये येतात. मालाची चढ-उतार या ठिकाणी केली जाते. आता क्रेन द्वारे लोडिंग डाउनलोडिंग केले जात असले तरी बाजारात हजारो माथाडी कामगार काम करतात. व्यापारी, वाहतूकदार आणि माथाडी कामगार यांच्यावर पूर्णपणे मार्केट अवलंबून आहे. दरम्यान करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे महानगर बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर बॉम्बे आयर्न मर्चंट्स असोसिएशन,बॉम्बे आयर्न ब्रोकर असोसिएशन, स्टील चेंबर इंडिया यांनी शुक्रवारी संयुक्त बैठक बोलावली होती. करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संघटनांचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व संघटनांच्या सभासद व त्यांच्या कर्मचार्‍यांच्या हितासाठी चर्चा करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार कळंबोली स्टील मार्केट, कटर व लोखंड बाजारपेठा बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. 20 मार्च, 2020 च्या मध्यरात्री पासून तळोजा 31 मार्च 2020 पर्यंत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.