पनवेल शहर पोलिसांना रोटरीचे मास्क

 


करोना या पार्श्वभूमीवर घेतला पुढाकार
पनवेल/ प्रतिनिधी: – करोना विषाणू चा फैलाव होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याकरीता पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत असताना करोना रोगा विरोधात लढा देणाऱ्या पनवेल शहर पोलिसांना
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या वतीने शनिवारी मास्क चे वाटप करण्यात आले.
करोना हा महामारी रोग पनवेल परिसरातही येऊन ठेवला आहे. कॉस्मोपॉलिटन महानगर असलेल्या पनवेल सह आजूबाजूच्या वसाहतींमध्ये परदेशवारी करून आलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. या भागात एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर काही संशयित रुग्ण सुद्धा या भागात आहे. दरम्यान पनवेल महानगरपालिका, जिल्हा व तालुका प्रशासनाबरोबरच पोलिसांनीही करोना व्हायरस बाबत जनजागृती आणि प्रबोधन सुरू केले आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचे रुग्ण शोधण्याकरीता पोलिसांची मदत घेतली जात आहे. परदेशवारी करून आलेल्या नागरिकांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. येथे पोलीस खडा पहारा देत आहेत. या कक्षातून पळ काढलेला नागरिकांचा शोध पोलिसांना घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात करोना चाचणी करण्यासाठी शेकडो रुग्ण येत आहेत . या पार्श्वभूमीवर येथेही पोलिसांना विशेष लक्ष द्यावे लागत आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश निर्गमित केले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. याशिवाय मास्क ,सॅनेटायझर चढ्या भावाने आणि बनावट पद्धतीने विक्रीच्या घटना घडत आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही पोलिसांना येत आहेत. एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण हे काम करीत असताना पोलिसांना करोना या महामारी रोगा विरोधातही कर्तव्य बजावे लागत आहे. यामध्ये पनवेल शहर पोलीस आघाडीवर आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना विषयी जनजागृती आणि प्रबोधन केले जात आहे. तुम्ही घरीच थांबा आम्ही कर्तव्यावर आहोत असा संदेश देणारे पोलिससुद्धा माणसच आहेत. त्यांनाही या महामारी रोगापासून संरक्षण आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या वतीने शहर पोलिसांना मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी
रोटरीचे डॉ. लक्ष्मण आवटे, डॉ. आमोद दिवेकर, रो.विवेक खाड्ये, रो.संतोष घोडिंदे उपस्थित होते.