रविवार करीता मच्छी मार्केटवर शनिवारीच ताव

 


जनता कर्फ्यू मुळे अगोदरच्या दिवशी पनवेल करांची गर्दी
मोठ्या प्रमाणात ग्राहक एकत्र आल्याने मोठा धोका
पनवेल /प्रतिनिधी:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू ची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल करांनी शनिवारी सायंकाळी उरण नाका येथील मच्छी मार्केटमध्ये मासळी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एकीकडे प्रशासन गर्दी करू नका असे आवाहन करीत असताना दुसरीकडे पनवेलकर अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागत असल्याचे शनिवारी मासळी मार्केटमध्ये दिसून आले.
कोरोना या महामारी रोगाचे संकट जग आणि देशाबरोबरच महाराष्ट्रावर ही चालून आले आहे. राज्यात 63 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. चोवीस तासांमध्ये 12 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना पनवेल पर्यंतही पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय योजना घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन त्याचबरोबर पोलीस यंत्रणांनी केले आहे. राज्य शासनाने गर्दी करू नका आवश्यक असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडा अशा सूचना दिल्या आहेत. कोरोना हा संसर्ग लगेच संक्रमित होतो. त्यामुळे कोठेही गर्दी करू नये असे वारंवार आवाहन केले जात आहे. यासाठी शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्यात. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहेत. या रोगाची लागण होऊ नये या पार्श्वभूमीवर या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार रविवारी बाहेर सामसूम असणार आहे. या सुट्टीच्या दिवशी मांसाहारावर विशेषता मासळीवर ताव मारण्याचा बेत चुकू नये. तसेच रविवारी दिवसभर घरात राहावे लागणार असल्याने अनेकांनी उरण नाका येथील मासळी मार्केट गाठले. त्यामुळे सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एकंदरीतच खबरदारी म्हणून गर्दी टाळणे आवश्यक असताना अशाप्रकारे मासळी खरेदी करण्यासाठी पनवेलकर तुटून पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूचे दुकाने बंदमधून वगळण्यात आले असले तरी अशाप्रकारे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करणे चुकीचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.