पनवेल रेल्वे स्थानकावरील शुकशुकाट

 


जनता कर्फ्यू ला रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद
पनवेल/ प्रतिनिधी: – कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्याला पनवेल रेल्वे स्थानक परिसरात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. येथे पूर्णपणे शुकशुकाट होता. प्रवाशांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होऊन कोरोना विरोधात संघटित लढा देण्याचा जणू काही संकल्प गेला असल्याचे जाणवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद रविवारी मिळाला. दरम्यान इतर यंत्रणांनीही सहभाग नोंदवला. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश दिसून आला. मुंबई येथून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. अगोदर तिकीट बुक केलेला रेल्वे प्रवाशांना पैसे परत केले जाणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांनी आहे त्याच ठिकाणी थांबावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. दरम्यान रविवारी रेल्वे प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले. पनवेल परिसरातील अनेक उत्तर भारतीयांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शुक्रवारी आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसली. मात्र रविवारी पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी दिसले नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर तसेच बाहेर पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला.