वाहने नाही तर … जनता कर्फ्यू सुसाट

 


मुंबई- पुणे एक्सप्रेस – वे ने घेतला मोकळा श्वास
दोन्ही बाजूचे लेन व टोल नाके पडले ओस
पनवेल/ प्रतिनिधी:- दिवसभरातून लाखो वाहने ये जा करणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी सकाळपासून वाहने दिसले नाहीत. या महामार्गावर वाहने नव्हे तर जनता कर्फ्यू सुसाट वेगाने धावताना दिसला. विशेष म्हणजे दोन्ही बाजूचे लेन आणि खालापूर टोल नाका आज ओस पडले होते .
मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गामुळे हे तीन तासात अंतर कापता येते. ताशी शंभर किमी वेगाने या महामार्गावर वाहने धावतात. एकूण 91 किमी अंतर असलेला हा द्रुतगती महामार्ग अधिक सुरक्षित समजला जातो. या महामार्गावर टोल भरून दररोज लाखो वाहने मुंबई-पुण्याला ये-जा करतात. सुट्टीच्या दिवशी चाकरमानी पर्यटनासाठी पुणे लोणावळा, महाबळेश्वर सातारा या ठिकाणी जातात. विशेष करून रविवार वन डे टूर साठी अनेक मुंबईकर पुण्याच्या दिशेने जातात व येतात. परिणामी या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहने द्रुतगती महामार्गावर दिसतात. दरम्यान कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी बाहेर न पडता घरातच राहावे अशी विनंती महाराष्ट्रातील जनतेला केले होते. याशिवाय प्रशासनानेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. दरम्यान वाहतूक संघटना त्याचबरोबर खाजगी वाहनांनी रविवारी रस्त्यावर वाहने न उतरवण्याचा स्वयंस्फूर्तीने संकल्प केला. त्यांनी पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिसून आला. कायम वाहनांची वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत वाहने वगळता चार चाकी, ट्रक, ट्रेलर, टँकर आणि दिसले नाहीत. हा महामार्ग पूर्णपणे मोकळा झाला. खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या नेहमीप्रमाणे रांगा नव्हत्या.