एक्सप्रेस – वे कळंबोली पोलिसांकडून लॉक डाऊन

 


कोरोना व्हायरस हे संक्रमण रोखण्यासाठी उचलले पाऊल
पनवेल /प्रतिनिधी: – मुंबई आणि पुणे या महानगरांना जलद गतीने जोडणाऱ्या एक्सप्रेस वे कळंबोली पोलिसांनी प्रवेशद्वारावर सोमवारी सकाळी 11 वाजता लॉक डाऊन केला. कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. त्यामुळे काही वाहनांना परत फिरावे लागले.
कोरोना या महामारी रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सकाळपर्यंत बाधितांची संख्या ७९ वर पोचली आहे. विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्वाची शहरे लॉक डाऊन केली आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा सुद्धा रविवारी मध्यरात्रीपासून बंद आहे. याशिवाय इतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात झाली आहे. परदेशातून येणारे विमान बंद ठेवण्यात आलेत . जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानांचे शटडाऊन आहेत . कोरोना या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत.31 मार्चपर्यंत राज्यातील नागरी भागात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. बाहेर पडू नका, गर्दी टाळा असे आवाहन शासनाकडून वारंवार केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे जनतेला अतिशय कळकळीची विनंती करीत आहेत. जिल्हा व महापालिका प्रशासन सुद्धा आपण घरी थांबा असे आवाहन लोकांना करीत आहेत. असे असतानाही सोमवारी अनेक जण खाजगी वाहनाने घराबाहेर पडले. विशेष करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खाजगी वाहने मोठ्या संख्येने दिसू लागले. जास्त लोक बाहेर पडले तसेच प्रवास करू लागले तर कोरोना विषाणूच्या संक्रमणची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वारावर पुण्याकडे जाणारी वाहने अडवली. आपण प्रवास टाळावा आणि पुन्हा घरीच जावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने वाहन चालक आणि प्रवाशांना करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी वाहन चालक आणि प्रवाशांना सूचना दिल्या.

वाशी टोल नाक्यावर ही वाहनांना अटकाव
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना वाशी टोल नाक्यावर अडवले जात असल्याचे समजते. त्यांना या ठिकाणाहून प्रवेश दिला जात नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे साहजिकच तिकडून येणाऱ्या वाहनांची संख्या बारा वाजेपर्यंत रोडावली.