नवी मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या बंद

 


कोरोना संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे आदेश
बिनतारी संदेशाद्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना
पनवेल /प्रतिनिधी: – कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्याचा बिनतारी संदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सोमवारी पाठविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल उरण आणि नवी मुंबई महापालिकेचा भाग येतो. या परिसराची लोकवस्ती मोठी आहे. दोन महापालिका त्याचबरोबर जेएनपीटी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहपोलाद मार्केट, ओएनजीसी याव्यतिरिक्त एमआयडीसी आणि नागरी वसाहती या ठिकाणी आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुद्धा सुरू आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जातात. एकंदरीतच हा परिसर वर्दळीचा आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात खबरदारी घेण्यात आली आहे. इतर ठिकाणांप्रमाणेच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुद्धा संचारबंदी लागू झाली आहेत. रविवारच्या जनता कर्फ्यू नंतर सोमवारी मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच वाहने रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पोलिसांना बंद करावा लागला. वारंवार आवाहन करूनही लोक बाहेर येतात. त्याचबरोबर गर्दीही करतात याबाबत पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. कोरोना संसर्ग टाळणे तसेच संचारबंदी ची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ लागणार आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्याचे आदेश दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी बिनतारी संदेश द्वारे विशेष शाखेने संबंधित अधिकारी तसेच प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.
चौकट
साप्ताहिक सुट्टी मात्र वगळली
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशांमध्ये साप्ताहिक सुट्टी चा समावेश नाही. म्हणजे ही सुट्टी सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय रजा वगळता किरकोळ व अर्जीत रजा बंद करण्यात आल्या आहेत.