पनवेल मनपाचे कोरोना प्रतिबंधात्मक हात तोकडे

 


समन्वय आणि उपाय योजना मध्ये अडचणी
पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे महत्त्वपूर्ण कारण पुढे
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका नव्याने स्थापन झालेली आहे. आकृतिबंध अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर इतर अनेक सुविधांचा वाणवा आहे. या कारणामुळे कोरोना या महामारी रोगा विरोधात मनपाचे हात तोकडे असल्याचे दिसून येत आहे. समन्वय तसेच उपाय
योजनेबाबत अनेक अडचणी प्रशासनाला येत आहेत.
पनवेल हे मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मध्ये आहे. मुंबई आणि कोकणाचे प्रवेशद्वार असणारे पनवेल हे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून विकसित झाले आहे. सिडको वसाहती आणि पनवेल शहराची लोकसंख्या ही सहा लाखांच्या आसपास आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.2016साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. जवळपास साडेतीन वर्ष पूर्ण झाले आहेत. असे असतानाही महापालिकेचा आकृतीबंध अद्यापही शासनाच्या दरबारी धूळ खात पडून आहे. त्याचबरोबर नागरी आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा सुविधांचा अभाव आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हे आजही अनेक वैद्यकीय गोष्टींचा वाणवा आहे. महापालिकेचा वैद्यकीय विभाग सक्षम नाही. प्रतिनियुक्तीवर आलेले मुख्य आरोग्य अधिकारी आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयात परत गेले आहेत. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे हा पदभार आहे. या अनेक गोष्टी कोरोना व्हायरसमुळे समोर आल्या आहेत. या महामारी रोगाचे संक्रमण होऊ नये म्हणून महापालिका आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल शहर वगळता इतर ठिकाणी कोरोना बाबत जनजागृती आणि प्रबोधन करणारे बॅनर्स, पोस्टर्स, माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे पोलिसांनी पुढाकार घेऊन कळंबोली सारख्या वसाहतींमध्ये असे फलक लावले आहेत. त्याचबरोबर महापालिकेवर अवलंबून न राहता राजेंद्र शर्मा यांच्यासारखे नगरसेवक जनजागृती तसेच आवश्यक साहित्य वाटप करताना पुढे आले आहेत. स्वच्छता सर्वेक्षण करिता महापालिका गावभर बॅनर, होर्डींग्ज लावते. परंतु कोरोना सारख्या महामारी आजाराचे लक्षणे त्यासाठी घ्यावयाची खबरदारी याविषयी महापालिकेकडून सिडको वसाहतीत तरी प्रबोधन झालेले नाही. त्याचबरोबर परदेश वारी करून आलेल्या नागरिकां बाबत नेमकी तक्रार कोणाला करायची हा मोठा प्रश्न आहे.मनपाकडे संपर्क साधला असता. तुम्ही पोलिसांमध्ये कळवा असे उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. यावरून याबाबत कोणाकडे तक्रार करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसापूर्वी महापालिकेने हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध केला आहे. परंतु त्या अगोदर या अडचणींना सामोरे जावे लागले. इतर महानगर प्रमाणे तपासणी केंद्र पनवेल परिसरात नाहीत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी फक्त दोनच हॉस्पिटल उपलब्ध असल्याचे समजते. इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या या महानगरात तपासणी केंद्रांचा मात्र तुटवडा आहे.

निर्जंतुकीकरण फवारणीचा अभाव
इतर ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. परंतु पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अशाप्रकारे फवारणी करण्यात येत नाही. काही सेक्टरमध्ये फवारणी करण्यात आली. परंतु ती डास निर्मुलनाची होती. तळोजा एमआयडीसीतील कारखानदारांच्या मदतीने महापालिका क्षेत्रात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण फवारणी करता येणे शक्य होते. परंतु त्याबाबत फारसे प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.

“पनवेल महापालिका स्थापन झाल्याने सिडकोकडे काहीच मागता येत नाही. पूर्वी आम्ही सिडको च्या मागे लागून सर्व कामे करून घेत होतो. पनवेल मनपाकडून इतर महापालिकेने प्रमाणे कोरोना बाबत हव्या तशा उपाययोजना होत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.”
आत्माराम कदम
ज्येष्ठ शिवसैनिक, कळंबोली