खाकी वर्दीला फुटला माणुसकीचा ‘पाझर’


बेघर, भिक्षेकरी आणि निराधारांना जेवण वाटप
सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांचा पुढाकार
नाना करंजुले
पनवेल प्रतिनिधी:- कोरोना या महाभयंकर रोगाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकला आहे. या विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकवीस दिवस भारत लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे बेघर, बिगारी आणि भिक्षेकरी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदी च्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून गस्त घालत असताना पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या ही बाब लक्षात आली. आणि त्यांनी सामाजिक बांधिलकीतून पनवेल भागातील अशा उपाशीपोटी असलेल्यांना अन्न देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
पोलीस आणि त्यात मोठे अधिकारी म्हटले की कडक शिस्त आणि पोलीसी खाक्या अशा प्रकारचा समज अनेकांमध्ये आहे. पोलिस म्हटले…. की नको रे बाबा !असा शब्द अनेकांच्या तोंडातून निघतो. मात्र पोलिस हे माणसच आहेत. ते समाजातील एक घटक आहेत. तेही संवेदनशील, प्रेमळ त्याचबरोबर माणुसकीबाज असतात. त्यांच्या मनातही प्रेम उत्पन्न होते. त्यांनाही दया असते. याचा प्रत्यय बुधवारी पनवेल परिसरातील उपाशीपोटी रस्ते त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या शेकडो जणांना आला. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लॉक डाऊन ची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस भारत बंद ठेवण्याचे जाहीर केले. कोरोना रोगाचे संक्रमण होऊ नये. या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर शहरांप्रमाणे पनवेल सुद्धा लॉकडाऊन झाले आहे. रेल्वे, बसेस त्याचबरोबर खाजगी वाहन बंद आहेत. बाजारपेठा सुरू नाहीत. उपहारगृह , वडापाव, पाणीपुरी त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे बेघर आणि बिगारी काम करणारे उपाशीपोटी राहत आहेत. पनवेल भागातील अनेक भिकारी सुद्धा पोटपूजा च्या विवंचनेत आहे. हे विदारक चित्र गस्त घालताना सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या लक्षात आले. त्यानुसार पनवेल परिसरातील अशा व्यक्तींना बुधवारी दुपारी त्यांनी जेवण दिले. गिड्डे यांनी स्वतः या सर्वांना अन्नाचे वाटप केले. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सामाजिक बांधिलकी जपत इतर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला.