डीमार्टमध्ये कोरोना संसर्गाची मोठी शक्यता?

 


महामारी आटोक्यात येईपर्यंत डीमार्ट बंद करा
ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांची मागणी

पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल परिसरातील डी मार्ट मॉल बंद करावेत अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी केली आहे. यामुळे कोरोना संक्रमण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन डी मार्ट व्यवस्थापनाला आदेश द्यावेत असा आग्रह शेट्टी आणि धरला आहे. जेणेकरून या महामारी रोगाची लागण होणार नाही. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन घोषित केला आहे. यामधून जीवनावश्यक वस्तू आणि दुकान वगळण्यात आले आहेत. दरम्यान डी मार्ट मॉलमध्ये खरेदी करण्याकरता लोक गर्दी करतात. याठिकाणी येणारे वस्तूंना हात लावतात. एखादा ग्राहक कोरोना बाधित असेल तर त्या विषाणूंचे संक्रमण दुसऱ्या ग्राहकांना सुद्धा होऊ शकते. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा संस्कार संसर्ग होऊ शकतो. असा मुद्दा पनवेल महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. पनवेल मनपा क्षेत्रात नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर या ठिकाणी डी मार्ट मॉल आहेत. याठिकाणी जीवनावश्यक वस्तू विक्री केले जात असल्याने डी मार्ट हे लॉक डाऊन मध्ये येत नाही. परंतु हे दुकान नसून मॉल आहे . आणि देशातील सर्व मॉल लॉक डाऊन मध्ये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान कपडे आणि इतर वस्तू विक्री याठिकाणी थांबवण्यात आली आहे. किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात आहे. त्याचबरोबर याठिकाणी कुपन सिस्टीम करून ग्राहकांना सोडले जाते. मात्र तरीसुद्धा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. रॅक वरील वस्तूंना ग्राहक हात लावतात. आणि किंमत पाहून त्या पुन्हा ठेवून देतात. त्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. परिणामी कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. याउलट जे किराणा दुकान आहेत. त्या ठिकाणच्या वस्तूंना दुकानदार वगळता इतर ग्राहक हात लावत नाहीत. परिणामी कोरोना संसर्गाची डीमार्ट प्रमाणे जास्त भीती नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व पार्श्वभूमीवर डी मार्ट मॉल बंद करून कोरोनाचा धोका टाळावा. अशी मागणी संतोष शेट्टी यांनी केली आहे.

संचार आणि जमावबंदीचे उल्लंघन
देशात संचार आणि जमाबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही डी मार्ट मध्ये तसेच बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. आत मधे कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्याचबरोबर स्थानिक प्रवाशांबरोबर. खरेदीसाठी लोक कुटुंबासोबत बाहेरूनही डी मार्ट मध्ये येतात. तिथे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा दिसून येतात. त्यांना कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. ही वस्तुस्थिती शेट्टी यांनी उपस्थित केली आहे.

“डी मार्ट हे मॉल आहे दुकान नाही. त्यामुळे ते इतर मॉल प्रमाणे बंद होणे आवश्यक आहे . ग्राहक आतमध्ये वस्तू किंमत पाहून ठेवून देतात. त्याचबरोबर ज्या ट्रॉली आहेत. त्यामध्ये सामान घेऊन ठेवतात. त्यांची साफसफाई केली जात नाही. परिणाम कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. याउलट लहान लहान दुकानात हा धोका कमी आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात येईपर्यंत डी मार्ट बंद ठेवावे. अशी माझी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मागणी आहे.”
संतोष शेट्टी
ज्येष्ठ नगरसेवक पनवेल मनपा