पनवेलमध्येही सोशल ‘डिस्टेंस’नेच अत्यावश्यक खरेदी

 


किराणा, मेडिकल व भाजी दुकानांसमोर सुरक्षित मार्किंग
महापालिका व पोलीसांचा पुढाकार
नाना करंजुले
पनवेल /प्रतिनिधी: – कोरोना या महामारी रोगापासून वाचण्यासाठी घरात राहणे. त्याचबरोबर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे हा एकमेव उपाय आहे. असे असले तरी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आता पनवेल मधील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांसमोर सुरक्षित मार्किंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका व  पोलीसांनी यासाठी आग्रह धरला. त्यानुसार येथे सोशल डिस्टेंसने खरेदी करावी लागणार आहे.
कोरोना चे संक्रमण थांबवावे यासाठी संपूर्ण भारत 21 दिवस लाॅक डाऊन करण्यात आला आहे. सध्या जमाव आणि संचारबंदी सुरू आहे. कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्दी करू नका. घराच्या बाहेर पडू नका अशा प्रकारच्या सूचना शासन, प्रशासन त्याचबरोबर पोलिस यंत्रणा देत आहेत. असे असताना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष करून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजी खरेदी विक्री करीता मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. याशिवाय मेडिकल, किराणा मालाच्या दुकानासमोर सुद्धा अशाच प्रकारे नागरिक मोठ्या संख्येने जमा होत आहेत. जमाव व संचारबंदीचे यामुळे उल्लंघन होतेच. परंतु ज्यासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. तो हेतू गर्दीमुळे साध्य होईल की नाही,अशी शंका निर्माण होत आहे. दरम्यान मूलभूत आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरीता जे नागरिक येतात त्यांच्यामध्ये सोशल डिस्टेंस दिसत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर अशा दुकानांसमोर सुरक्षित अंतरावर ग्राहक उभे राहावेत. तसेच त्यांना सवय लागावी. याकरीता सक्ती करण्यात यावी हा मुद्दा महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व  पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी उपस्थित केला. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती, मेडिकल्स आणि दुकानदार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सहमती दर्शवली. याविषयी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठकी संपन्न झाली. यावेळी सभापती राजेंद्र पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर अजयकुमार लांडगे, यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य व व्यापारी बांधव उपस्थित होते. त्यानंतर स्टोअर्स, भाजी मार्केट आणि औषधांच्या दुकाना समोर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक  पोलीसांनाच्या उपस्थित सुरक्षित मार्किंग करण्याचे काम सुरू केले. यापुढे ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवूनच अत्यावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनी तसेच दुकानदारांनी स्वतः सुरक्षितता घ्यावी असे आवाहन पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांच्या गाळयातुनच मालाची विक्री
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यातूनच मालाची विक्री करण्याच्या सूचना बुधवारी देण्यात आल्या. त्याचबरोबर शेतीमाल बाहेर आणू नये, खरेदी व विक्रीसाठी ग्राहकांमध्ये ठराविक अंतर असावे. चारही प्रवेश द्वारांजवळ सुरक्षा रक्षकांनी येणाऱ्या प्रत्येकाला हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर द्यावेत , मोठ्या ग्राहकांसाठी ठराविक वेळ देण्यात यावा. त्यांच्याशी संपर्क करून व्यापाऱ्यांनी बोलवावे जेणेकरून बाजारपेठेत गर्दी होणार नाही. असे आवाहन महापालिका व पोलीसांनी केले .