पनवेल घंटागाडी कामगारांकडून लॉकडाऊन

 

कोरोना सुरक्षिततेबाबत मनपा व ठेकेदाराचे दुर्लक्ष
पनवेल/ प्रतिनिधी : – पनवेल महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी बुधवारी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी काम बंद केले. कोरोना रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महापालिका आणि ठेकेदाराकडून कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याने आमचे आरोग्य धोक्यात सापडले असल्याचे कामगारांनी सांगितले. त्यामुळे मनपा क्षेत्रात कचरा उचलण्यात आला नाही. याबाबत मनपा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील साडेचारशे टनापेक्षा पेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. हा कचरा 300 हुन अधिक कामगार घंटागाडी द्वारे उचलतात. सोसायटी टू सोसायटी जाऊन लहान गाड्या घनकचरा संकलन करतात. तर काही ठिकाणी कॉम्पॅक्टर च्या माध्यमातून तळोजा क्षेपण भूमीवर नेला जातो. दरम्यान मनपा क्षेत्रात काम करणारे सर्व स्वच्छता दूत अनेक सुविधांपासून वंचित आहेत. याविरोधात आझाद कामगार संघटनेने वारंवार आंदोलनही केले आहेत. परंतु अद्यापही सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झालेल्या नाही. त्यातच कोरोना या महामारी रोगाच्या सावटाखाली पनवेल परिसर सुद्धा आहे. सगळीकडे संचारबंदी सुरू असताना इतर सफाई कर्मचाऱ्यां प्रमाणेच घंटागाडी कामगार हे कचरा उचलण्याचे काम करीत आहेत. परंतु कोरोना पासून या कामगारांना संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तसेच कामगारांना सुरक्षिततेचे साधने पुरवण्यात आले नाहीत. पनवेलचे ही स्वच्छता दूत हे भीतीच्या सावटाखाली आहेत. तसेच ते सुरक्षित असल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही कंत्राटी कामगार आहोत पाठीमागे संपूर्ण कुटुंब आहे. कोरोना ही महाभयंकर साथ पसरली आहे. आणि आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून तसेच कचरा उचलण्याचे काम करीत आहोत. महापालिका आणि ठेकेदार लक्ष देत नसल्याने आज काम बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे कामगारांनी सांगितले.