गरिबांच्या बंद चुली…. खाकीतील माणुसकीने पेटवल्या

 

कळंबोली पोलिसांकडून झोपड्यांमध्ये धान्य वाटप
पोलीस उपायुक्तांच्या उपस्थितीत जपली सामाजिक बांधिलकी

नाना करंजुले
पनवेल /प्रतिनिधी: – वारंवार आवाहन करूनही रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवला जात असला तरी. खाकी वर्दी दुसऱ्या हाताने भुकेल्यांना दोन घास मिळावा यासाठी पुढाकार घेते . याचा प्रत्यय गुरुवारी सायंकाळी कळंबोलीत आला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरीता एकवीस दिवस लॉकडाऊन असल्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांवर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची भूक आणि वेदना ओळखून कळंबोली पोलिसांनी सुमारे चारशे कुटुंबीयांना धान्य वाटप केले. तसेच त्यांना फूड पॅकेट सुद्धा देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत सामाजिक बांधिलकी जपली.
कोरोना या महाभयंकर रोगापासून नागरिकांना संसर्ग होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. पुढील एकवीस दिवस यामुळे सर्वांना घरात बसून राहावे लागणार आहे. रेल्वे, बसेस त्याचबरोबर खाजगी वाहने बंद आहेत. रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी लोकांचा संचार बंद आहे. बांधकाम, तसेच इतर कामे बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कळंबोलीत झुडो मॉल लगत तसेच गुरुद्वारा च्या बाजूला असलेला झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिगारी कामगार राहतात. त्याचबरोबर कचरा वेचक महिला आणि पुरुषही सुद्धा राहतात. सिंग सिटी हॉस्पिटल आणि होल्डिंग पाँड परिसरात तसेच मार्बल मार्केट जवळ सुद्धा झोपड्या आहेत. तिथे सुद्धा बिगारी कामगार आणि कचरावेचक आहेत. दिवसभर काम केले तरच संध्याकाळी या झोपडपट्टी धारकांची चूल पेटते. मात्र सर्व कामकाज बंद असल्याने आपल्या व कुटुंबीयांच्या पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मूळ गावी परतण्यासाठी वाहने सुद्धा बंद आहेत. त्यामुळे एकवीस दिवस या ठिकाणीच काढावे लागणार असल्याने मोठा विवंचनेत झोपडपट्टीमधील शेकडो कुटुंब असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड तसेच त्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत असताना. बंदच्या काळात भुकेल्यांना अन्न देऊन त्यांना मदतीचा हात देण्याचा संकल्प गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. त्याच भावनेतून गुरुवारी कळंबोली परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्ते धन्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, डाळ आणि तेलाचा समावेश होता. सोशल डिस्टन्स ठेवून कळंबोली पोलिसांनी ही सामाजिक बांधिलकी जपली. पोलीस फक्त कारवाईच करतात. गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकतात. आमच्या मनात आतापर्यंत पोलिसांची इतकी ओळख होती. परंतु आज अडचणीच्या काळात त्यांनी आमच्या बंद पडलेल्या चुली पेटवल्या .पोलीस बांधव आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देव बनून आले अशा प्रतिक्रिया झोपडपट्टीतील रहिवाशांनी नोंदवल्या. दरम्यान याकरीता काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्ययक्ष सुदाम पाटील यांचे सहकार्य मिळाले.

“लॉकडाऊनलोड मुळे या गरीब झोपडपट्टी धारकांच्या हाताला काम राहिले नाही. म्हणून आमच्या कळंबोलीतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना धान्य आणि अन्नाचे वाटप केले. ज्याला खरोखरच गरज आहे. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याकरीता पोलिस नक्कीच पुढाकार घेतील.”
अशोक दुधे
पोलीस उपायुक्त