मोहोपाडयातील खाजगी दवाखाने लॉकडाऊन

डॉक्टरांनी घेतला कोरोनाचा धसका
सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल
रसायनी/ प्रतिनिधी रसायनी मोहोपाडा परिसर औद्योगिक आणि बाजारपेठ साठी प्रसिद्ध आहे. येथील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोहोपाडा येथील खाजगी डॉक्टर मंडळींनी कर्तव्याची जाण न ठेवता हॉस्पिटल लॉकडाऊन केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे, त्या अनुषंगाने आपल्या देशातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबरीने वातावरण बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळाले आहे, वास्तविक सध्याची परिस्थिती पाहता खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने चालू ठेवणे आवश्यक होते. पोलीस, सरकारी दवाखाने व काही खाजगी दवाखाने आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. मात्र मोहोपाड्यात डॉक्टरांनी जणू हरताळ केला आहे. इतर वेळा रुग्णांची रांग असलेल्या ही दवाखाने सायलेंट मोड वर गेलेली आहेत, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत . आजच्या परिस्थितीत विविध आजारांवर उपचारांची गरज आहे हे डॉक्टर मंडळी का लक्षात घेत नाहीत हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे. कोरोना व्हायरस आला म्हणजेच तो एकच आजार आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दुसरे पण आजार आहेत . मग डॉक्टर का सेवेपासून लांब जात आहेत. असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. सरकारी रुग्णालयांकडे बोट दाखवण्याची आता सुरुवात झाली आहे . परंतु वाढत्या लोकवस्तीला शासकीय आरोग्य विभाग वैद्यकीय सुविधा पुरविण्यास असमर्थ आहे. असताना खाजगी डॉक्टरांना सामाजिक बांधिलकी आहे की नाही. अशा प्रतिक्रिया मोहपाडा येथे नोंदवल्या जात आहेत.
लॉकडाऊन मध्ये पोलीस, सरकारी व्यवस्था चोखपणे कर्तव्य बजावताना दिसत आहे. त्याचबरोबरीने किराणा, दूध, मेडिकल, भाजीवाले हे काही पैसा कमविण्यासाठी आटापिटा करत नाहीत .तर सामजिक बांधिलकी जपत आहेत. राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात असे अनेक दवाखाने आहेत की त्यामध्ये दूरवरच्या विविध भागातील नर्स, वॉर्डबॉय, काम करीत आहेत. ती मंडळी आपली जबाबदारी ओळखून काम करीत आहेत, आजारपणात डॉक्टर देवाच्या रुपात असतो, असे म्हंटले जाते. आजच्या घडीला सर्व देऊळ बंद करण्यात आलेले आहेत. म्हणूनच देवळांप्रमाणे या आरोग्य देवाच्या दरवाजांना टाळे लागले आहे. अशी मोहपाडा येथील स्थिती आहे. डॉक्टर सेवा का देत नाहीत, माणसाचा आणि कर्तव्याचा सोयीनुसार विसर तर त्यांना पडलाय का हा प्रश्न अनुत्तरित आहे .