अत्यावश्यक सेवेच्या टेम्पोत अनावश्यक प्रवाशी वाहतूक

 


कळंबोली मॅकडोनाल्ड च्या समोर प्रकार उघडकीस
नवी मुंबई पोलीस आयुक्तांसमोर समक्ष कारवाई
नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी:- नवी मुंबई कडून सातारा फलटण ला जाणाऱ्या दुधाच्या टेम्पोमध्ये 20 ते 25 प्रवासी बसून बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक सुरू होती. शुक्रवारी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कळंबोली पोलीस आणि वाहतूक शाखेने हा प्रकार उघडकीस आणला. विशेष म्हणजे कळंबोली मॅकडोनाल्डच्या समोर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासमक्ष ही कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे वाहतुकीतून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणूंचे संक्रमण थांबवण्यासाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्यात आला आहे. एसटी, खाजगी बसेस, वाहने त्याचबरोबर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या सीमा सुद्धा सीज करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसेच ठाणेकरांना आपल्या मूळ गावी जाता येत नाही. सध्या नागरिकांनी ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी रहावे. घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना शासन व प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. तसेच आवाहनही वेगळ्या माध्यमातून केले जात आहे. कोरोना चा संसर्ग होऊ नये याकरीता सुरक्षित अंतर ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लॉक डाउन मधून सूट देण्यात आली आहे. परंतु त्यांना इतर वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. असे असताना घाटमाथ्यावरून दूध घेऊन येणाऱ्या टेम्पोमध्ये मुंबईकडून परताना टेम्पो चालक पाठीमागे प्रवासी भरत आहेत. या आणीबाणीच्या काळात जास्त भाडे आकारून पैसे कमावण्याचा सध्या गोरखधंदा सुरू आहे. हा प्रकार शुक्रवारी कळंबोली मॅक्डोनाल्ड हॉटेल समोर नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला. एम एच 43 बिजी 67 36 या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये पाठीमागे 20 ते 25 प्रवासी बसून कोणाला दिसू नये म्हणून शटरडाऊन करण्यात आले होते. पुढे अत्यावश्यक सेवा अशा प्रकारे स्टिकर लावण्यात आला होता. आणि पाठीमागे प्रवाशांचे कोम्बिंग करून फलटण या ठिकाणी हा टेम्पो चालला होता. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या टेम्पोची झाडाझडती घेतली. पाठीमागील शटर उघडताच आत मध्ये दाटीवाटीने बसलेले प्रवासी दिसून आले. विशेष म्हणजे त्यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार पनवेल परिसराच्या भेटी करता आले होते. त्यांच्या समक्ष अशा प्रकारची वाहतूक कळंबोली पोलीस आणि वाहतूक शाखेने उघडकीस आली. संबंधिता वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशाप्रकारच्या वाहतुकीवर आमची करडी नजर असल्याचे अंकुश खेडकर यांनी सांगितले.