कोरोनाने कळंबोली वसाहत हादरली

 

 

पाच सीआयएसएफ च्या जवानांना संसर्ग
पनवेल/ प्रतिनिधी: – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या पाच सीआयएसएफच्या जवानांना कोरोना ची लागण झाली आहे. हे सर्व कळंबोली येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या कॅम्प मध्ये राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान यामुळे कळंबोली वसाहत पूर्णपणे हादरून गेली आहे. तसेच या कॅम्पच्या आजूबाजूच्या सोसायट्यां तील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या भागात महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षणही करण्यात आल्याचे समजते.
कळंबोली सेक्टर 4 येथे सात मजली इमारत आहे. त्याठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना राहण्यासाठी कॅम्प करण्यात आला होता. दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेची जबाबदारी या जवानांवर आहे. याठिकाणी कर्तव्यावर असणारे हे जवान कळंबोली येथे राहत होते. दरम्यान त्यापैकी एक जवान कोरोना ने बाधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आणखी चार जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान पनवेल महानगरपालिकेने आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये सर्वेक्षण केले. त्यामध्ये कोणताही संशयित रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा सीआयएसएफ च्या जवानांना झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. परदेश वारी करून आलेले हजारो प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यापैकी काहींना कोरोनाची लागन झाली आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्याने सीआयएसएफ च्या जवानांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. असल्याचे समजते.

भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती तक्रार
भारतीय जनता पक्षाचे कळंबोली सचिव संतोष गायकवाड यांनी १६ मार्च रोजी कळंबोली सेक्टर ४ येथील केंद्रीय औद्योगिक बलाचे जवान सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरत असल्याचे शहराध्यक्ष रवीनाथ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली होती. दरम्यान याबाबत पाटील यांनी कळंबोली पोलिसांना तक्रार केली होती. त्यानंतर संबंधितांना सूचना देण्यात आली. परिणामी हे जवान आत मध्ये थांबत होते. आणि त्यानंतर या कॅम्पातील पाच जवान कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले.