पनवेलचे भाजी मार्केट मोकळ्या मैदानात हलवा

 


कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शिवसेनेचा प्रस्ताव
महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली मागणी
पनवेल/ प्रतिनिधी:- कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी मार्केट मोकळ्या मैदानावर तात्पुरते हलवावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पक्षाचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. याबाबत गांभीर्याने विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाशी येथील एपीएमसी भाजी मार्केट तात्पुरत्या स्वरूपात खारघर मधील सेंटर पार्कच्या बाजूच्या मैदानावर हलवण्याचा दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. ही गोष्ट खरोखर आवश्यक होती. त्यामुळे प्रशासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केट सुद्धा बाहेर हलविण्यात यावे अशी मागणी रामदास शेवाळे यांनी केली आहे. कारण पनवेल बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीविक्रेते, व्यापारी, ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. परिणामी कोरोना संसर्ग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी वारंवार आवाहन आणि विनंती करूनही गर्दी केली जाता आहे. म्हणून येथील भाजी मार्केट खांदा वसाहतीतील सर्कस मैदान किंवा नवीन पनवेल येथे राजीव गांधी मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात नेण्यात यावे असा प्रस्ताव केवळ पनवेल शिवसेना महानगर प्रमुखच नाही तर एक नागरिक या नात्याने मी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिला असल्याचे शेवाळे म्हणाले. यामुळे गर्दी टाळता येईल. तसेच सामाजिक अंतराने भाजीपाला विक्री आणि खरेदी होईल. परिणामी कोरोना विषाणूचे संक्रमण होणार नाही. याबाबत मनपा, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मतही महानगरप्रमुखांनी व्यक्त केले आहे.