कोरोना विरोधात लढण्यासाठी एक महिन्याचे मानधन

 


पनवेल मनपाच्या नगरसेविका दर्शना भोईर यांचा निर्णय
पनवेल/ प्रतिनिधी: – कोरोना या महामारी रोगा विरोधात संपूर्ण देश लढत आहे. यापासून संसर्ग होऊ नये या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी मनपाकडून मिळणारे एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी मनपा आयुक्तांना पत्रही दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत 21 दिवस लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या संचारबंदी सुरू आहे. देशभरात अडीच हजारांपेक्षा जास्त जणांना या रोगाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील आकडाही दोनशेच्या वर गेला आहे. त्याचबरोबर काहींचा मृत्यू सुद्धा झाला आहे. कोरोनाचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. सर्व उत्पन्न बंद असल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरीता वैद्यकीय साधने उपलब्ध केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना दोन वेळचं जेवण सामाजिक संस्थांबरोबरच शासनाकडूनही दिले जात आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे पॅकेज सुद्धा जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये आपले एक महिन्याचे मानधन जमा करण्याचा निर्णय दर्शना भोईर यांनी घेतला आहे. पनवेल परिसरातही कोरोनाचे चे रुग्ण आढळले आहेत. तसेच लॉक डाऊनमुळे हजारो कामगार, बेघर तसेच भिक्षेकरी यांचा समोर अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकामी सामाजिक संस्था, व्यक्ती त्याचबरोबर लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत. दर्शना भोईर यांनीही अशा गोरगरीब गरजुंना मदतीचा हात दिला आहे.