सीआयएसएफ चे आणखी सहा जवान पॉझिटिव्ह

 

कळंबोली वसाहतीवर कोरानाचे सावट
अन्य जवान एमजीएम मध्ये विलगीकरण कक्षात
पनवेल /प्रतिनिधी:- केंद्रिय सुरक्षा बलाच्या कळंबोली येथील कॅम्पमध्ये आणखी सहा जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याचे समजते. त्यामुळे हा आकडा 11 वर गेला आहे. इतर जवानांना एमजीएम रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे कळंबोली वसाहत पूर्णपणे हादरून गेली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लागण झाल्याने हे जवान आणखी कोणाच्या सानिध्यात आले होते. याबाबत चौकशी सुरू आहे.

मुंबई विमानतळाची सुरक्षिततेची जबाबदारी ही सीआयएसएफ च्या जवानांवर होती. दरम्यान परदेश वारी करून आलेले अनेक प्रवासी कोरोना बाधित झालेल्या आहेत. त्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे सुरुवातीला सीआयएसएफच्या एका जवानाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आणखी चार जणांना बाधा झाली. दरम्यान हे सगळे जवान कळंबोली येथील सेक्टर 4 येथील कॅम्पात राहत होते. पाच जवानांना कोरोना चा संसर्ग झाल्यानंतर या ठिकाणचे इतर 100 पेक्षा जास्त जवानांना एमजीएम हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले. त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आणखी सहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.
एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले आहेत. त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. याकडे
विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड विशेष लक्ष ठेवून आहेत.