कळंबोली पोलिसांचा लाॅकडाऊन रूट मार्च

 

घरात राहून कोरोनावर मात करण्याचे आवाहन
नागरिकांमध्ये आदर तर आदेश मोडणाऱ्यांना  दरारा
नाना करंजुले
पनवेल प्रतिनिधी: -कोरोना संसर्ग वाढवू नये याकरीता 22 मार्च पासून देशभरात लाॅक डाऊन सुरू आहे. असे असताना काहीजण संचारबंदी पाळत नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहेत. यापुढे त्याचे उल्लंघन होऊ नये तसेच सर्व आदेशांचे पालन व्हावे या अनुषंगाने कळंबोली पोलिसांनी शुक्रवारी वसाहतीत रूट मार्ग काढला. यातून पोलिसांची शिस्त त्याचबरोबर अनुशासनाच्या दर्शन घडले.
कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी संपूर्ण भारत बंद करण्यात आला आहे. त्याअगोदरच महाराष्ट्र सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली होती. कोरोनाची साखळी तोडून या रोगाला हद्दपार करण्याच्या दृष्टिकोणातून राज्य व केंद्र सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यासाठी जनतेने घरातच राहावे बाहेर पडू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासन तसेच पोलिस यंत्रणांकडून ही गर्दी टाळण्यास वारंवार सांगण्यात येते. आजही याविषयी प्रबोधन आणि जनजागृती सुरू आहे. तरीसुद्धा काही लोक कोणतेही कारण नसताना रस्त्यावर उतरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी असतानाही शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कलंबोली पोलीसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे . सर्वात अगोदर संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच लॉकडाउनलोड असताना एका शाळेचे शैक्षणिक संकुलाचे बांधकाम सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली. कोरोना विषाणू बाबत सर्वात अगोदर प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भिंती पत्रक आणि बॅनर लावण्यात आले. याबाबत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे प्रबोधन सुरुवातीला कळंबोली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. दरम्यान कळंबोली येथील सीआयएसएफ कॅम्प मधील अकरा जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे वसाहतीमध्ये विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. हा संसर्ग पसरू नये या पार्श्वभूमीवर प्रशासनाबरोबरच कळंबोली पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने कुठे गर्दी होणार नाही. याकडे पोलिसांचे विशेष लक्ष आहे. त्यासाठी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वसाहतीत रुट मार्च काढण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांचे मनोबल वाढविण्याबरोबरच जे संचार बंदीचा आदेश पाळणार नाहीत. त्यांच्या मनामध्ये पोलीस आणि कायद्याची भीती राहावी हा या पाठीमागचा उद्देश होता.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सॅल्यूट
शुक्रवारी कळंबोली वसाहतीत काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्यासह एक पोलीस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक, 40 कर्मचारी, सहा होमगार्ड आणि एसआरपीचे कर्मचारी सहभागी झाले होते. कळंबोली वसाहतीतील मोकळ्या रस्त्यांवर पोलिसांचा हा रूट मार्च खिडक्यांमधून नागरिक पहात होते. आपला जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणार्थ 24 तास सतर्क असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी आणि बाल्कनीतून जय हिंद म्हणत सॅल्यूट मारला.

रूट मार्चमध्ये सोशल डिस्टन्स
कळंबोलीतील पोलिसांच्या रूट मार्च मध्ये सोशल डिस्टन्स दिसून आला. मार्च च्या काळात ठराविक अंतराने अधिकारी आणि कर्मचारी चालताना दिसत होते.