कामोठे वसाहतीत पोलिसांकडून सतरा वाहने जप्त

 


कामोठे पोलीस व कळंबोली वाहतूक शाखेची कारवाई
प्रतिनिधी: – कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशभर लाॅकडाऊन करण्यात आला आहे. असे असतानाही काही वाहने रस्त्यावर विनाकारण फिरताहेत. त्यांच्याविरोधात कामोठे पोलीस आणि कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने शनिवारी मोहीम राबवण्यात आली. सतरा वाहने जप्त करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी संपूर्ण भारत बंद करण्यात आला आहे. त्याअगोदरच महाराष्ट्र सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली होती. कोरोनाची साखळी तोडून या रोगाला हद्दपार करण्याच्या दृष्टिकोणातून राज्य व केंद्र सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यासाठी जनतेने घरातच राहावे बाहेर पडू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासन तसेच पोलिस यंत्रणांकडून ही गर्दी टाळण्यास वारंवार सांगण्यात येते. आजही याविषयी प्रबोधन आणि जनजागृती सुरू आहे. तरीसुद्धा काही लोक कोणतेही कारण नसताना रस्त्यावर उतरत आहेत. वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी असतानाही शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कामोठे पोलीस आणि कळंबोली वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे तसेच कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवारी विनाकारण रस्त्यावर उतरलेले सतरा वाहने जप्त करण्यात आले. वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी दीडशे वाहनांची कसून तपासणी केली. पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह कामोठे पोलीस ठाणे आणि कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या दुचाकी वाहनांवरही इ चलन द्वारे कारवाईचा बडगा उगारला.