अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर ठरल्या देवदूत


गरोदर मातेस प्रसूतीसाठी आपटे केंद्रात वेळेत पोचवले
पनवेल प्रतिनिधी : – कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी लाॅडाऊन सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत. या पार्श्वभूमीवर आपटे गावात एका महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यावेळी नियमित गृह भेटीला आलेल्या अंगणवाडी सेविकेने आशा वर्कर आणि रिक्षाला बोलून संबंधित गरोदर मातेला वेळेत आपटे आरोग्य केंद्रावर पोहोचवले. आणि त्या ठिकाणी प्रसूती होऊन माता आणि बाळ सुखरूप आहे. या दोघी संबंधित महिला करता खऱ्या अर्थाने देवदूत ठरल्या.
अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या.
त्यावेळी मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेवून गरोदर मातेस तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी श्रीमती मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची
यशस्वी नैैसर्गिक प्रसूती केली.
त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे.
करोना विषाणूच्या या संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात आहे. रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवली. तसेच प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिला आहे.