कोरोना बाधितांच्या कुटुंबीयांना चाचणी न परवडणारी

 


संबंधितांची मोफत कोविड 19 चाचणी करावी
सभापती संजय भोपी यांची पनवेल मनपाकडे मागणी
पनवेल/ प्रतिनिधी: पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. बाधीतांच्या कुटुंबीतील सदस्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान संबंधितांना त्वरित काॅरन्टाईन करावे आणि त्यांची मोफत कोविड 19 तपासणी करण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागणी प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी महापालिकेकडे केली आहे. संबंधितांना या चाचणी करीता येणारा खर्च परवडणारा नाही. किंवा अनेकांकडे तितके पैसे असतातच असे नाही. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी असा मुद्दा भोपी यांनी उपस्थित केला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष करून मुंबई अत्यावश्यक सेवा देण्याकरीता जाणाऱ्या अनेकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला आहे. दरम्यान कोविड19 पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कात त्यांचे कुटुंबीय येतात. या सर्वांना त्वरित कोरन्टाईन करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते लॅब मध्ये पाठवणे गरजेचे आहे. दरम्यान संबंधितांना स्वतः चाचणी करून घेण्याचे सांगितले जाते. कोविड19 चाचणी खर्चिक आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या कुटुंबीयांना हा खर्च परवडणारा नाही. कित्येकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्यांची चाचणी करण्यासाठी तीस ते पस्तीस हजार रुपये ते आणणार कुठून असा मुद्दा सभापती संजय भोपी यांनी उपस्थित केला आहे. अगोदर मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. रोजगार बंद असल्याने हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण सर्वसाधारणपणे त्या कुटुंबातील प्रमुख असल्याने मानसिक स्थिती बिघडलेली असते. पूर्ण कुटुंब भयभीत झालेले असत. त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिले जाते. इतके मोठे संकट ओढवलेले असताना. त्यांना स्वखर्चाने कोविड19 चाचणी करायला लावू नये अशी मागणी संजय भोपी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच कोरोनाबाधीत कुटुंबियांच्या चाचण्या फास्ट ट्रॅक वर करण्यात याव्यात त्याकरता विलंब होऊ नये. तसेच येणारा खर्च महानगरपालिकेने उचलावा असाही आग्रह प्रभाग समिती सभापतींनी धरला आहे.

रुग्ण सापडलेल्या इमारती त्वरित सिल करा
जा सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तसेच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या इमारती त्वरित सिल करण्याची गरज आहे. अनेकदा त्यासाठी उशीर होतो ही वस्तुस्थिती आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे विलंब होतही असेल मात्र त्यामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. प्रशासनाने त्वरित या इमारती सील कराव्यात अशी मागणी प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे.