पनवेललाही मुंबईच्या धर्तीवर सचिव दर्जाचा अधिकारी नेमा

पालकमंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांना लेखी विनंती

अलिबाग/ प्रतिनिधी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे. मुंबई तसेच आसपासच्या परिसरात करोनाबाधित रुग्ण संख्या आटोक्यात राहावी व त्यासंबधी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई महानगरात सचिव प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची झोननिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पनवेल परिसरातही अशाप्रकारे अधिकारी कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात यावेत अशी मागणी रायगडचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आहे.
मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवण्याकरता पनवेल परिसरातून अनेक जण रोज जातात. यापैकी काहीना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत आहे. पनवेल महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या दिवस वाढत चालली आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेल,उरण,खारघर, कामोठे, कळंबोली या मुंबई जवळच्या शहरात सुद्धा मुंबई महानगराप्रमाणेच विभागनिहाय प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी अशी महत्वपूर्ण मागणी रायगडच्या पालकमंत्र्यांनी केली आहे. जेणेकरुन स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षमपणे राबविता येईल, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.