अत्यावश्यक सेवा कोरोना विषाणूंच्या कचाट्यात

 


कुटुंबची कुटुंब कोविड विषाणूंच्या विळख्यात
कोरोना पासून बचाव करण्यासाठी उपाय योजना करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल प्रतिनिधी: – पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी मुंबई जाणारे शेकडो जण कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांची कुटुंब सुद्धा कोविड विषाणूंचा विळख्यात आहेत. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करणारे योद्धे आणि त्यांचा परिवार या वैश्विक संकटात आहे. संबंधितांना कोरोना पासून वाचवण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. तसेच याविषयी सरकारने काय धोरण अवलंबले हे जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई पालिकेत पनवेल व इतर भागातून रोज कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाऊले उचलण्याची गरज होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी केल्याचे नमूद करून या संदर्भात मुंबई महापालिकेतर्फे या कर्मचाऱ्यांची सोय मुंबईमध्येच करण्याचे जाहीर झाले होते, परंतु याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.
पनवेल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण म्हणून ज्यांची नोंद आहे. त्यापेकी बहुतांश मुंबई मध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे अथवा त्यांचे परिवार जन आहेत. अशा सर्व शासकिय व खाजगी सेवाकर्मीची रोगाचे संक्रमण थांबेपर्यंत मुंबईत रहाण्याची व्यवस्था करता येत नसल्यास किमान त्यांचे व त्यांच्या परिवार जनांना कोरोना रोगाची लागण होण्यापासुन बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार याची माहिती लोकप्रतिनिधी म्हणून मला व पनवेल तालुक्यातील नागरीकांना तातडीने मिळावी. अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचविण्यासाठी शासनाने उपाययोजना करावे, असेही सूचित केले आहे.