पनवेल नंतर उरण सुद्धा रेड झोन मध्ये

 


जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले घोषीत
पनवेल /प्रतिनिधी: – रायगड जिल्हा जरी ऑरेंज झोन मध्ये असला तरी पनवेल परिसरात वाढत्या कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेड झोन जाहीर करण्यात आले होते. आता उरणमध्ये ही कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संपूर्ण तालुका रेड झोन जाहीर केला आहे.
उरणमध्ये करंजा गावात जवळपास 49 कोरोना रुग्ण आढळले आहेत . तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलला लागूनच असलेल्या उरणमध्ये कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी तहसीलदारांनी तालुका रेड झोन घोषित करावा असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. या सर्व गोष्टींचा विचार करता निधी चौधरी यांनी उरण रेड झोन म्हणून जाहीर केले आहे. शासनाने रेड झोन साठी घातलेली प्रतिबंधात्मक निर्बंध उरण तालुक्यासाठी लागू राहतील. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.