पनवेल परिसरात कोविड केअर सेंटर वाढणार

उलवे, करंजाडे आणि खांदा वसाहतीतील इमारतींचे अधिग्रहण

अलिबाग / प्रतिनिधी : – कोविड-19 रुग्णांमध्ये असणाऱ्या या सौम्य,मध्यम व गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करण्यात येत आहे. संबंधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालये, शासकीय, निमशासकीय इमारत पुढील आदेश होईपर्यंत संबंधित इमारत व त्या इमारतीमधील उपलब्ध सर्व संसाधनांसह अधिग्रहण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. उलवे, करंजाडे आणि खांदा वसाहतीतील रा जि प शाळा, वस्तीगृहाच्या इमारतींचा त्यामध्ये समावेश आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्र, ग्रामीण भाग, उरण या भागात मोठ्याप्रमाणात रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णां मुळे अधिकची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
सिडको शाळा इमारत, करंजाडे, सिडको ऑफिस, सेक्टर-19, उलवे नोड,आदिवासी विभाग, मुलांचे वसतिगृह,पनवेल, खांदा कॉलनी, जिल्हा परिषद शाळा, करंजाडे, या इमारती कोविड केअर सेंटर यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जे.एन.पी.पी.टी.हॉस्पिटल, उरण, ही इमारत डीसी एचसी करिता अधिग्रहित करण्यात आलेली आहे.
तर उपजिल्हा रुग्णालय,पनवेल व एम.जी.एम.हॉस्पिटल, कामोठे या इमारती डी सी एच यासाठी अगोदर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.