मंगलमय :शिवकर ग्रामपंचायतीत नव दांपत्याचे सातफेरे

 


जान्हवी व अरविंद यांची सामाजिक अंतराने सप्तपदी
पनवेल /प्रतिनिधी: जगभरात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढत असताना ज्यांची लग्न जमलेली आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यासाठी शिवकर ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावातील मुलींचे जमलेले विवाह लावून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वरच्या हॉल मध्ये व्यवस्था केली आहे. मंगळवारी याठिकाणी आणखी एक शुभ लग्न पार पडले. तेही सोशल डिस्टन्स चा अवलंब करीत, अशाप्रकारे शिवकर ग्रामपंचायतीने एक आदर्श इतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे समोर ठेवला आहे.
कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून मार्च महिन्यापासून लॉक डाऊन सुरू आहे. असे असतानाही कोविंड 19 चे रुग्ण संख्या वाढतच चालले आहेत. पनवेल तालुक्यात यामुळे काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मुंबईपासून जवळच असलेला पनवेल परिसर रेड झोन मध्ये आहे. त्यातच अत्यावश्यक सेवा देण्याकरीता या परिसरातून अनेक जण मुंबईत जातात. त्यांना कोरोना संसर्ग होत असल्याने पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच ज्यांचे लग्न जमले आहेत. त्यांना या लग्नसराईत विवाह करता येत नाहीत. ब्रह्मचर्यातुन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी विलंब लागत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा सर्वात आनंदाचा संस्कार आणि विधि असतो. दोन जीवांचं या माध्यमातून मिलन होते. त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होते. परंतु लग्नगाठीत जुळलेल्या दोघांच्या मिलना मध्ये व्हिलन म्हणून कोरोना हा महामारी रोग आलेला आहे. या कठीण प्रसंगात शिवकर ग्रामपंचायतीने लग्न जमलेल्या जोडप्यांचे विवाह लावून देण्याचा संकल्प केला आहे. याकरीता सरपंच अनिल ढवळे यांनी पुढाकार घेतला आहे.
मंगळवारी अजित महाराज खुतले या पुरोहितांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये लग्न पार पडले. शिवकर गावातील तुकाराम महादू मुंढे यांची कन्या जान्हवी हिचा विवाह अलिबाग तालुक्यातील महाजने गावचे बामा धर्मा अवचटकर यांचा पुत्र अरविंद याच्या बरोबर ठरला होता. मात्र कोरोना मुळे लग्न होणार कसे असा प्रश्न पडला होता. परंतु मंगळवारी दुपारी १२.३५ मी या शुभमुहूर्तावर या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आप्तेष्ट उपस्थित होते. वऱ्हाडी मंडळींनी सामाजिक अंतराचे पालन केले. जान्हवी व अरविंद यांनी मास्क लावून सप्तपदी केली. या पूर्वी 18 एप्रिल 2020 रोजी रोजी प्रगती संजय पाटील हीचा विवाह अलिबाग तालुक्यातील खिडकी गावचे सुपुत्र नंदन मुरलीधर पाटील यांच्याशी शिवकर ग्रामपंचायतीत झाला. कोरोना या वैश्विक संकटात शिवकर ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवून गावकऱ्यांना आधार दिला. स्वस्त भाजी केंद्रापासून गोरगरिबांना अन्न वाटप सुद्धा करण्यात आले. या ग्रामपंचायतीने इतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांवर वस्तुपाठ ठेवला आहे.