उरण व कर्जत येथे स्वॅब टेस्टिंग बुथ

 


कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना
पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पुढाकार

अलिबाग, जिमाका:- उरण व कर्जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूची लागण तपासणी करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना होवू नये. याकरिता रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून उरण व कर्जत येथे नवीन तंत्रज्ञानावर आधारित स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ देण्यात आले आहेत रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यातर्फे बारदेस्कर यांनी दोन स्वॅब टेस्टिंग क्यूब बुधवारी सुपूर्द केले.
सध्या वाढत जाणाऱ्या संशयित करोना बाधित रुग्णांची स्वॅब सॅम्पल तपासणी जलद गतीने होण्यासाठी कोविड -19 स्वॅब सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसित केले आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड, रोहा, तळा, सुधागड आदी ठिकाणी हे बूथ आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत.
करोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी जवळून थेट संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. या स्वॅब टेस्टिंग बूथमुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामध्ये सुरक्षित अंतर राहील व त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट संसर्ग होणार नाही.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटल, उरण व कर्जत येथील उप जिल्हा रूग्णालय येथे हे बूथ बसविण्यात येत आहेत. याद्वारे पीपीई किट चा खर्चाची बचत तर होईलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणी देखील होवू शकेल. तसेच या उपकरणामुळे पीपीई किट्सचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्वॅब सॅम्पल घेता येतील.