तळोजातील पाचशे मजुर उत्तर प्रदेशला परतणार

 


तळोजा पोलिसांचे उत्तम नियोजनामुळे झाले सोपस्कर
पनवेल /प्रतिनिधी: -लॉकडाऊन मध्ये तळोजा परिसरात अडकलेले 500 मजूर बुधवारी सायंकाळी विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना होणार आहेत. दरम्यान तळोजा पोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे या कामगारांना आपल्या मूळ गावी जाता येणार आहे. बुधवारी सकाळपासूनच याबाबतची तयारी सुरू करण्यात आली. पोलीस ठाण्यात सर्व सोपस्कर बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
पनवेल परिसरात उत्तरेकडे राज्यातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले आहेत. तळोजा एमआयडीसी त्याचबरोबर इतर ठिकाणी मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील अनेकांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांशी जण आजूबाजूच्या गावातील चाळींमध्ये राहतात. गेल्या काही दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने या मजुरांच्या हाताला काम राहिले नाही. परिणामी ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. यापुढेही लॉकडाऊन वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी इच्छा असतानाही त्यांना काम मिळेल असे दिसत नाही. दरम्यान केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यानुसार पनवेल परिसरातून आतापर्यंत हजारो कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. तळोजा परिसरातील 500 मूळ उत्तर प्रदेशातील कामगारांना संध्याकाळी विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गेल्या काही दिवसापासून परिश्रम घेत आहेत. बुधवारी सकाळी एसटी बसेसमधुन या कामगारांना तळोजा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कम्युनिटी हॉलमध्ये सहा लॅपटॉपवर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान संबंधितांना पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जेवणाचीही सोय करण्यात आली. सायंकाळी या सर्व कामगारांना पनवेल रेल्वे स्थानकावर एसटी बसने नेण्यात येणार आहे.तेथून ते रेल्वेत बसून आपल्या मूळ गावी मार्गस्थ होणार आहेत.