पनवेलच्या बाहेरून आलेल्या व्यक्तीबाबत त्वरित माहिती द्या

 


पनवेल महापालिकेचे सोसायट्यांना निर्देश
पनवेल/ प्रतिनिधी:- आपल्या सोसायट्यांमध्ये पनवेलच्या बाहेरून कोणी व्यक्ती आल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्या. असे निर्देश मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जेणेकरून कोरोना विषाणूंचे संक्रमण होणार नाही. यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत बाहेरूनही अनेक लोक येत आहेत. त्यात लॉक डाऊन मध्ये अडकलेल्यांचाही समावेश आहे. आपल्याकडून इतर लोक बाहेर मूळ गावी जात आहेत. त्याप्रमाणे इतर राज्य आणि जिल्ह्यातूनही कित्येक जण पनवेल परिसरात येत आहेत. दरम्यान पनवेल परिसरात अद्यापही कोरोना समूह संसर्ग झालेला नाही. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना लागण होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या अधिकच वाढत आहे. कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातून सुद्धा काही लोक पनवेल मनपा हद्दीत राहण्यासाठी येत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा पनवेल बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण असावे. त्यांचा डाटा जमा करण्यात यावा, तसेच त्यांना सक्तीचे काॅरन्टाईन करावे अशी मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी सचिन गायकवाड सर्वप्रथम केली होती. त्याचबरोबर प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनीही प्रशासनाला पत्र दिले होते. एकंदरीतच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अशाप्रकारे बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवणे त्यांचे आयसोलेशन करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी गृहनिर्माण संस्थांना निर्देश निर्गमित केले आहेत.

या क्रमांकावर संपर्क साधा

परगावाहून तसेच पनवेल बाहेरून नागरिक दाखल झाले तर महानगरपालिकेच्या ९ ७६ ९ ०१२०१२ या व्हॉट्सअप नंबरवर अथवा १८००२२७७०१ टोल फ्री नंबरवर कळवावे .

माहिती लावल्यास कारवाई
नागरिकांची माहिती लपविल्यास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल . वरील दिलेल्या सूचनांचे पालन सोसायटी सदस्यांनी न केल्यास महानगरपालिकेकडे तक्रार करावी . सर्व पदाधिकारी यांनी उक्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे , तसे न केल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८ ९ ७ खाली तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील प्रकरण १० कलम ५६ अन्वये कारवाई करून संबंधित सोसायटीतील पदाधिकारी सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी , सदर आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.