झोपडपट्टीधारकांना पनवेल महापालिकेचे ‘अन्न’छत्र

 


खांदा वसाहतीत गरीब व गरजू झोपडपट्टीवासीयांना अन्न वाटपास सुरुवात
प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल/ प्रतिनिधी:- खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालया समोर आणि बालभारती जवळ झोपडपट्टी आहे. लॉकडाऊन असल्याने याठिकाणी राहणाऱ्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी संबंधित झोपडपट्टी धारकांची जेवणाची व्यवस्था करावी अशी महत्वपूर्ण मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शनिवारी मनपाच्या अन्नछत्रातुन संबंधितांना अन्न वाटप करण्यात आले. त्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालयाच्या समोर आणि बालभारती च्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून गरीब लोक झोपड्यात राहतात. बिगारी काम करून जे पैसे मिळतील ते त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. काहीजण कचरा वेचून पोटाची खळगी भरतात. दरम्यान आता  लाॅकडाऊन सुरू असल्याने ना बिगारी काम मिळतय . ना कचरा वेचता येतो ना तो विकता येतो. त्यामुळे घरात धान्याने किराणा शिल्लक राहिलेला नाही. तो खरेदी करण्याकरता त्यांच्याकडे पैसेच नाहीत. इतकी बिकट अवस्था या गरीब झोपडपट्टी वासियांची झाली आहे.  त्यांना रेशन सुद्धा मिळाले नाही. दरम्यान या झोपडीत राहणाऱ्या गरिबांवर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. या ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती आहे. कोरोना पेक्षा झोपडपट्टीधारकांना उपासमारीची अधिक चिंता आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेला निवेदन दिले होते. खांदा वसाहतीत सेक्टर 12 येथील झोपडपट्टीवासियांना मोफत जेवण देण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली होती. माणुसकीच्या आधारावर संबंधितांना अन्नछत्रातुन जेवण देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती सभापतींनी केली होती. महापालिका प्रशासनाने शनिवारपासून याठिकाणी जेवण पाठवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे पदाधिकारी भीमराव पोवार यांच्यासह मनपाच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स पाळून येथील गरीब कुटुंबांना जेवण दिले. याबद्दल झोपडपट्टीतील रहिवाशांनी सभापती संजय भोपी, भीमराव पोवार आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहे. संबंधितांना अन्न क्षेत्रातून नियमित जेवण मिळेल असा आशावाद संजय भोपी यांनी व्यक्त केला आहे.