नवीन पनवेल मधील ए टाईप कंटेनमेंट झोन

 

 


सर्व परिसर महानगरपालिकेकडून सील
पनवेल /प्रतिनिधी:- नवीन पनवेल येथील ए टाईप  मध्ये रविवारी सहा कोरोना रुग्ण आढळून आले. त्या अगोदरही याठिकाणी संसर्ग झाला होता. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून पनवेल महानगरपालिकेने ए टाईप परिसर कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. याठिकाणी बाहेरून येणाऱ्यांना तसेच येथील रहिवाशांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.

नवीन पनवेल सेक्टर १३ मधील ए – टाईप येथे आतापर्यंत १३ नागरिकांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे . याठिकाणी पाच फळ विक्रेते तसेच दोन किराणा दुकानदारांचे कोविंड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अल्प उत्पादन गटातील ही सिडकोची चाळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. यापूर्वी ए – टाईप क्षेत्रात ०५ कोरोना विषाणू बाधित बिल्डींग सिलींगचे आदेश लागू केले होते . तथापि , सदर क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे संक्रमण वाढतच आहे . त्यात रविवारी आणखी काही रुग्ण सापडले आहेत. या करीता येथील कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. त्यासाठी संपूर्ण क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोरोना विषाणू बाधित क्षेत्र लाल रंगाने दर्शवून सदरची हद कायम केली आहे . सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सदर कोरोना बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे . असा आदेश मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी पारीत केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना मुभा
अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास मुभा राहिल . त्यामध्ये संरक्षण सुरक्षा सेवा , आरोग्य आणि कुटुंब कल्याण , पोलीस . कारागृह , सिमा शुल्क महाराष्ट्र मंत्रालयीन कर्मचारी अधिकारी , गृहरक्षक , नागरी संरक्षण , अग्निशमन आणि आपत्तकालिन आपत्ती व्यवस्थापन सेवा , आणि पनवेल महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आदींचा समावेश आहे. त्यांचे ओळखपत्र तपासूनच परवानगी दिली जाईल .