मुंबईच्या कोविड योद्ध्यांकडे राहत्या ठिकाणी संशयाची नजर

 


प्रोत्साहना ऐवजी अवहेलना होत असल्याची वस्तुस्थिती
काही सोसायट्यांमध्ये अडवणूक होत असल्याच्या तक्रारी
शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणारे खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी राहत्या ठिकाणी त्यांची अवहेलना होत आहे. काहींची सोसायट्यांमध्ये सुद्धा अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. संबंधित मुंबईत जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्र त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांमधून जेथे नागरी वसाहती आहेत येथून अनेक जण अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जातात. त्यामध्ये डॉक्टर्स, मुंबई पोलीस, परिचारिका, बेस्ट कर्मचारी, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, पेट्रोलियम कंपन्या, मोबाईल कंपन्यातील अभियंते, मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार याशिवाय इतरांचा समावेश आहे. हे सर्व कोविंड योद्धे आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत ते कोरोनाशी दोन हात करीत आहेत. आपला जीव धोक्यात घालून हजारो जण देशासाठी काम करीत आहेत. ही सर्व मंडळी खऱ्या अर्थानं देवदूत आहेत. त्यांच्यापैकी काहींना कोरोना संसर्ग झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही लागण झालेली आहे. ही सर्व मंडळी आपल्या जीवावर उदार होत सेवा देत आहेत . परंतु त्यांचे कौतुक दूरच राहिले पण, ते जिथे राहतात तिथे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. काही ठिकाणी त्यांच्या नावाने खडे फोडले जात आहे. काही सोसायट्यां कोविड योद्ध्यांना त्रास सुद्धा देत आहेत. त्यांना गेटच्या आत मध्ये येऊन न देण्यासारखे प्रकार घडतात. अशा तक्रारी आमच्याकडे येत असल्याचे शिवसेनेचे दीपक निकम यांनी सांगितले. एकंदरीतच इतके मोठे काम करीत असतानाही त्यांना कोविड वाहक म्हणून संबोधले जात आहे. त्यांच्यामुळेच पनवेल ला कोरोना आला असल्याचे सांगत आरोपीच्या पिंजऱ्यात एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या उभे केले जात असल्याबद्दल निकम यांनी खंत व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई जात असलेल्यांच्या मानसिकतेवर होत आहे. सीमा बंदी, जिल्हाबंदी हे मुद्दे पुढे करून या मंडळींची अडवणूक करण्याचा प्रयत्न काही ठिकाणाहून होत आहे. परंतु अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची मुभा आहे. याचा विसर अनेकांना पडत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून अशाप्रकारे अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्यांना ते ज्या ठिकाणी राहत आहेत. त्याठिकाणी कायदेशीर संरक्षण मिळावे. तसेच त्यांची अडवणूक करणारे तसेच चुकीची वागणूक देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी न्याय्य मागणी दीपक निकम यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे.

“अत्यावश्यक सेवेकरिता मुंबईत जाणारे खऱ्या अर्थाने खूप मोठे काम करत आहेत. त्यांच्यामुळेच राज्याच्या राजधानी आपण कोविड या महामारी विरोधात लढा देत आहोत. मात्र त्यांची राहत्या ठिकाणी अडवणूक केल्याच्या काही तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. कर्तव्य म्हणून ही सर्व मंडळी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देता येत नसेल तर किमान अडवणूक तरी करू नका अशी आमची ते राहत असलेल्या पनवेल परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांना कळकळीची विनंती आहे.”
दिपक रामचंद्र निकम
पनवेल विधानसभा संघटक, शिवसेना