विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर मंगळवारपासून कोकण दौऱ्यावर

 


पनवेल परिसरापासून होणार सुरुवात
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार
भाजपचे इतर आमदारही सुद्धा सहभागी होणार

पनवेल / प्रतिनिधी: – कोकणामधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार मंगळवार १९ मे पासून कोकणचा दौरा करणार आहेत. पनवेल येथून या दौऱ्याला सुरुवात होणार आहेत. त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे इतर आमदारही सहभागी होणार आहेत.

कोकणच्या दौ-याची सुरुवात रायगड जिल्यापासून होणार आहे. सकाळी ९.३० वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हयाचे जिल्हाधिकारी व अन्य शासकीय अधिका-यांशी चर्चा करण्यात येईल. तेथून ११.४५ च्या सुमारास कोन येथील इंडियाबुल्स क्वारांटाईन सेंटर ला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १.१५ च्या सुमारास पेण येथील गणेश मूर्तिकारांची भेट दिली जाईल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येईल. याप्रसंगी आमदार रविशेठ पाटील उपस्थित राहणार आहेत. तेथून महाड येथील प्रांताधिका-यांशी कोरोनोच्या परिस्थितीसंदर्भात विरोधी पक्षनेते भाजपचे आमदार चर्चा करतील.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची सर्व अधिका-यांशी चर्चा करुन सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच या तीनही जिल्ह्यांमधील तेथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व सध्या सुरु असलेल्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हास्तारावरील स्थानिक प्रशासनाला अधिक मदतीची आवश्यकता असल्यास आमदार निधीतून मदत उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.
कोरोनाच्या सध्याची परिस्थितीत अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रणात आणण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने संबंधित जिल्हाधिका-यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहेत.
माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर भाई गिरकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, नितेश राणे, रमेश पाटील व महेश बालदी या दौ-यामध्ये सहभागी होणार आहेत.