पनवेल महापालिका आयुक्तांच्या बदलीला विरोध

 

गणेश देशमुख यांची करण्यात आलेली बदली रद्द करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल/ प्रतिनिधी: पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची राज्य शासनाने मंगळवारी रात्री ठाणे महानगरपालिकेत बदली केली आहे. कोरोनाच्या संकटात शिस्तबद्ध काम करणाऱ्या देशमुख यांची बदली रद्द करण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

डॉ. सुधाकर शिंदे यांच्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त पदाची जबाबदारी गणेश देशमुख यांनी स्वीकारली होती. दोन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेत त्यांनी काम केले. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेची घडी बसवण्याचा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्रयत्न केला. काही विकास कामे देशमुख यांनी मार्गी लावले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान मनुष्यबळाची कमतरता असतानाही गणेश देशमुख यांनी शिस्त आणि नियोजनबद्ध काम गेल्या दीड-पावणेदोन महिन्यात काम केले. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस यंत्रणेने बरोबर उत्तम समन्वय साधला. कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना सुद्धा त्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात आल्या. परिणामी स्थानिकांना समूह कोरोना संसर्ग झालेला नाही. मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जाणारे वगळता महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचे संक्रमण रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामध्ये गणेश देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.
अशा परिस्थितीत त्यांची बदली करणे म्हणजे पनवेल करांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी नोंदवली आहे.

“गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सुरुवातीपासूनच अनेक विकासकामांना गती देण्याचे काम केले . याबाबतीत पनवेलकरांच्या मनात त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली आहे. त्याचबरोबर कोरोना सारख्या वैयक्तिक संकटात शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी काम केले.
त्यामुळे त्यांची बदली तातडीने रद्द करून पुन्हा त्यांना पनवेल महानगरपालिकेचा कारभार सोपवण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.”

आमदार प्रशांत ठाकुर